Indian Railway Tendernama
पुणे

पुणे रेल्वे स्थानकातून राजस्थानला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज

टेंडरनामा ब्युरो

कात्रज (Katraj) : पुणे-जोधपूर-पुणे दैनंदिन रेल्वेसेवेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

रेल्वे क्रमांक २०४९५ व २०४९६ या दोन रेल्वेगाड्या नियमितपणे हडपसरवरून धावणार आहेत. त्यामुळे राजस्थानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. लवकरच रेल्वे प्रवासाचे बुकिंगही सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील संपूर्ण राजस्थानी समाजातर्फे मागील अनेक वर्षापासून ही सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. राजस्थानमधील खासदार पी. पी. चौधरी, गजेंद्रसिंग शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर मान्यवरांनी ही सेवा सुरू करण्यासंबंधी राजस्थानी समाजाच्या वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता, अशी माहिती राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष मगराज राठी यांनी दिली.

रेल्वेसेवेची मागणी पूर्ण झाल्याने संपूर्ण राजस्थानी समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून, पुणे-जोधपूरदरम्यान सध्या रोज साधारणतः ६० ते ७० बस सुरू आहेत.

याठिकाणी असेल थांबा

पाली, मारवाड, अबू रोड, पालनपूर, मेहसाना, अहमदाबाद, बडोदरा, सुरत, वापी, वसई रस्ता, कल्याण, लोणावळा, चिंचवड अशा ठिकाणी ही रेल्वे थांबा घेणार आहे.