PMC Pune
PMC Pune Tendernama
पुणे

जानेवारी आलातरी ऑक्टोबरचा पगार मिळेना; सुरक्षारक्षकांना वाली नाही?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (PMC) सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ठेकेदाराची (Contractor) मुदत संपली. त्यानंतर नवीन ठेकेदार आले, त्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार दिले. पण जुनी ठेकेदार कंपनी क्रिस्टल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने अजून १५९० कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार दिला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका प्रशासन केवळ नोटिस बजावत असल्याचे सांगत असले तरी कर्मचाऱ्यांना पगार कधी मिळणार याबाबत मात्र स्पष्टता दिली जात नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

सुरक्षारक्षकांना ऐन दिवाळीतही पगारासाठी महापालिकेवर मोर्चा काढण्याची नामुष्की आली होती. अखेर अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन ठेकेदाराशी चर्चा करून कामगारांना पगार देण्यात आला. दरम्यान, क्रिस्टल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या टेंडरची मुदत ३१ ऑगस्ट २०२२ रोजी संपली. पण टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. एक नोव्हेंबरपासून महापालिकेत सैनिक सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस आणि ईगल इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी प्रा. लि. या दोन कंपन्यांना काम देण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्यांनी १६४० कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार बँक खात्यात जमा केला आहे. मात्र जुन्या क्रिस्टल इंडिया प्रा. लि. कंपनीकडून ऑक्टोबर २०२२ चा एकाही कर्मचाऱ्याला पगार देण्यात आलेला नाही. यासंदर्भात क्रिस्टल इंडिया प्रा. लि. रविराज लायगुडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.

महापालिकेने नवे ठेकेदार नियुक्त केल्यानंतर त्यांनी ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या व प्रकृती ठीक नसलेल्या सुमारे २५० सेवकांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचा पगार तर मिळाला नाहीच, पण महापालिकेतील नोकरीही गेली अशी विचित्र अवस्था झाली आहे. हे कर्मचारी त्यांचा ऑक्टोबरचा पगार मिळावा यासाठी खेटे मारत असले तरीही पगार जमा झालेला नाही.

काही सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, पगार नसल्याने निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींना तोंड देताना किती वाईट स्थिती झाली आहे, मुलांना काही खायलाही घेऊन देऊ शकत नाही, शेजाऱ्यांकडे, ओळखीच्यांकडे उसणे पैसे मागावे लागत आहे. आपली परिस्थिती कथन करताना सुरक्षा रक्षक पुरूष व महिलांना अश्रू रोखता आले नाहीत.

क्रिस्टल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने अजून ऑक्टोबर महिन्याचा पगार अद्याप दिलेला नाही. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आलेली असून, पुढील कारवाई करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला जाणार आहे.

- माधव जगताप, उपायुक्त, सुरक्षा विभाग

क्रिस्टल कंपनीने सुरक्षा रक्षकांना पगार जमा करावा यासाठी थेट त्यांच्याशी बोलून कार्यवाही केली जाईल. तसेच त्यांनी पगार दिल्याशिवाय त्यांचे इतर कोणतेही बिल व इतर देणी दिली जाणार नाहीत.

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका