पुणे (Pune) : नदीपात्रातील भिडे पूल ते रजपूत वसाहत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी पथ विभागाने सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पण पूर्णपणे डांबरीकरण न करता पुन्हा खड्डे भरून रस्त्यावर ठिगळे लावली जात आहेत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.
नदीपात्रातल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे दुचाकीस्वारांना त्रास होत आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, पण अद्याप काम सुरू झालेले नाही. या रस्त्यावर डांबरीकरण केले जाणार असल्याचे पथ विभागातील अधिकाऱ्यांना माहिती असूनही येथे केवळ खड्डे बुजविण्यासाठी डांबरीकरण केले आहे. त्यामुळे एकाच कामासाठी दुबार खर्च होणार आहे. दरम्यान, खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्याने तात्पुरते डांबरीकरण केले असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
याबाबत पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे म्हणाले, ‘‘नदीपात्रातील संपूर्ण रस्ता नव्याने करण्यासाठी खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यासाठी हा रस्ता काही दिवस बंद देखील ठेवला जाणार आहे. ठेकेदाराबरोबर करारनामा झालेला नाही, करारनामा झाल्यानंतर काम सुरू केले जाईल.