G20
G20 tendernama
पुणे

पुण्यात ठेकेदाराची बनवाबनवी; उघड झाल्यानंतर अधिकाऱ्यावरच...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ‘जी २०’च्या (G-20) निमित्ताने उड्डाणपूल, पुलांची रंगरंगोटी करण्यासाठी मागविलेल्या टेंडरमध्ये एका ठेकेदाराने अनुभवाचा खोटा दाखला जोडताना बनवाबनवी केल्याने त्याला अपात्र करण्यात आले. मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांवर दादागिरी करून त्याला पात्र ठरविण्यासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे.

‘जी २०’ परिषदेसाठी शहरात ५० कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी ३ कोटी रुपये शहरातील ठराविक उड्डाणपूल, नदीवरील पूल, समतल विगलक अशा १७ ठिकाणी सुमारे १ लाख चौरस फुटाचे रंगकाम केले जाणार आहे. प्रकल्प विभागाने त्यासाठी टेंडर मागवली, पण ३ कोटी रुपयांची एकच टेंडर आल्याने व तेवढी क्षमता नसल्याने एकाही ठेकेदाराने टेंडर भरले नाही. त्यामुळे त्यात बदल करून प्रत्येक १ कोटी रुपयांची तीन टेंडर काढण्यात आले.

मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गोडावूनला वॉशेबल ऑइल बाँड डिस्टेंपर हा रंग लावण्याचा अनुभव असलेल्या ठेकेदाराने निविदा भरली होती तर महापालिकेच्या निविदेनुसार ॲन्टीकॉब्रोनेशन पेंट लावण्याचा अनुभव असणे आवश्‍यक होते. महापालिकेला ठेकेदाराने ॲन्टीकॉब्रोशन पेंटिंगचे काम केल्याबद्दल संशय आल्याने त्यांनी याबाबत बाजार समितीकडे पत्रव्यवहार करून चौकशी केली. त्यावेळी या ठेकेदाराने मोशी येथे ॲन्टीकॉब्रोनेशन पेंट लावला नाही तर ऑइल बॉंड लावल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदारास अपात्र केले. त्यामुळे या ठेकेदाराने प्रकल्प विभागात गोंधळ घालून मला का अपात्र केले आहे असे विचारून गोंधळ घातला. मी तुमची चौकशी लावतो, कारवाई करतो अशा धमक्या देण्यास सुरवात केली. अखेर अधिकाऱ्यांनी दबाव झुगारून पात्र ठेकेदारांचे टेंडर काढून काम वाटून दिले.

असा आला संशय

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणी करताना ॲन्टीकॉब्रोनेशन पेंट हा फक्त पुलासाठी वापरतात. तो गोडावूनला वापरला जात नाही. तसेच ॲन्टीकॉब्रोनेशन पेंटचा प्रत्येक चौरस फुटासाठी २५० रुपये इतका खर्च येतो. तर ऑइल बाँडसाठी केवळ ४५ रुपये चौरस मीटर खर्च आहे. असे असताना ठेकेदाराने गोडावूनला ॲन्टीकॉब्रोनेशन पेंट लावला, त्याचा खर्चही कमी दिसत असल्याने संशय आला.