पुणे (Pune) : वाहतूक कोंडी अन् पार्किंगच्या त्रासाला वैतागलेल्या पुणेकरांचा कॅबला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. प्रवाशांच्या संख्येत ज्या प्रमाणात वाढ होत आहे, त्या प्रमाणात कॅबची सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. सद्यःस्थितीत पुण्यात सुमारे ६० हजार कॅबची वाहने असून, कॅबची सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे. ही वाढ मागील दोन वर्षांत झाली. पूर्वी कॅबच्या सेवेत दोन कंपन्यांची मक्तेदारी होती. त्याला छेद देत आता काही उद्योजक कॅबच्या क्षेत्रात ‘प्रवास’ करीत आहेत.
पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे अन्य पर्याय उपलब्ध असले तरीही प्रवासी कॅबच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. पुण्यात रोज सुमारे ५ लाख प्रवासी कॅबच्या माध्यमातून प्रवास करीत आहेत, तर पिंपरी चिंचवड मध्ये ही संख्या सुमारे दीड लाखाच्या घरात आहे. पुण्यातील प्रवाशांची संख्या मागच्या वर्षी सुमारे ४ लाख इतकी असल्याचे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुण्यात रिक्षांची संख्या जास्त आहे. मात्र रिक्षांच्या तुलनेत कॅबचा प्रवास स्वस्त पडत असल्याने प्रवासी कॅबला प्राधान्य देत आहे. रिक्षाला प्रतिकिलोमीटर भाडे १७ रुपये आहे, तर कॅबला प्रतिकिलोमीटर ९ ते १० रुपयांचा दर आकारला जात आहे. गर्दीच्या वेळी अथवा पाऊस पडल्यावर मात्र या दरात मोठी वाढ होते. सामान्य वेळी मात्र अंतर्गत स्पर्धेमुळे कॅब कंपन्यांनी मात्र ९ ते १० रुपये प्रतिकिलोमीटर असा दर आकारला आहे.
‘कॅब’वाढीची कारणे
- रिक्षाच्या तुलनेत स्वस्त प्रवास
- वाहतूक कोंडी
- पार्किंगचा जटिल प्रश्न
- रोजगाराचा प्रश्न
- काही रिक्षाचालक कॅब व्यवसायाकडे वळले
प्रवाशांना फायदा काय
- रिक्षाच्या तुलनेत प्रवास स्वस्त
- पार्किंगच्या समस्येपासून सुटका
- सहजपणे कॅब उपलब्ध होत आहे
- उपलब्धता वाढल्याने प्रवाशांना वाहन निवडण्याचे पर्याय
सार्वजनिक वाहतूक आणि प्रवासी
- पीएमपी बस : सुमारे १३ लाख
- रिक्षा : सुमारे ३० लाख
- मेट्रो : सुमारे दीड लाख
- कॅब : सुमारे ५ लाख
- लोकल : ३० ते ३५ हजार
(प्रवासी संख्या दैनंदिन स्वरूपातील आहे)
रिक्षाच्या तुलनेत कॅबचे दर स्वस्त आहेत. परिणामी प्रवाशांचा ओढा कॅबकडे जास्त आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याने कंपन्यांची संख्या वाढत आहे. शिवाय वाहतूक कोंडीसारखी बाबदेखील प्रवासी संख्या वाढण्यासाठी निर्णायक ठरत आहे.
- डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच, पुणे
कॅब व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. त्यामुळे या व्यवसायात परप्रांतीयचालकांची संख्यादेखील वाढत आहे. ‘आरटीए’ने कॅबचे प्रवासी दर प्रतिकिलोमीटरसाठी जाहीर केलेले आहेत. त्याची अमंलबजावणी होणे आवश्यक आहे.
- वर्षा शिंदे-पाटील, माँ साहेब कॅब संस्था, अध्यक्ष