Mumbai Pune Expressway
Mumbai Pune Expressway Tendernama
पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरील अपघात रोखण्यासाठी मोठे पाऊल; 24 तास

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune Expressway) वाहतुकीस शिस्त लागून अपघातांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्याच्या उद्देशाने एक डिसेंबरपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहेत. त्यानुसार तब्बल सहा महिने द्रुतगती मार्गावर प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि महामार्ग पोलिसांची २४ तास करडी नजर ठेवण्यात येणार असून त्यासाठी पथकही नेमण्यात येणार आहे.

विशेष मोहीम का?
- विविध उपाययोजनांनंतरही द्रुतगती मार्गावरील अपघात कमी होत नसल्याचे चित्र
- अपघाती मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने महामार्गावरील सुरक्षित वाहतुकीकडे अधिक लक्ष
- नियमांच्या काटेकोर अंमबलजावणीनंतरही बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही

मोहीम दृष्टिक्षेपात
- प्रत्येक तपासणी पथकाच्या प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे विशेष जबाबदारी
- दररोज सकाळी १० वाजता गेल्या २४ तासांत पथकांनी केलेल्या कारवाईचा तपशील अद्ययावत करावा लागणार
- दर सोमवारी सकाळी १० वाजता आठवड्याच्या कामगिरीचा अहवाल परिवहन आयुक्तांना सादर करावा लागणार
- तपासणीदरम्यान इंटरसेप्टर वाहनांवर पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर
- त्याद्वारे वाहनचालकांना रहदारीचे नियम पाळण्यासंबंधी वारंवार उद्‍घोषणासुद्धा केल्या जाणार
- तपासणी मोहिमेवर देखरेख, नियंत्रण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी रस्ता सुरक्षा कक्षाचे उपपरिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर

अशी असेल सज्जता
- महामार्गावरील एका तपासणी पथकात किमान दोन मोटार वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी
- सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पथकाचे नियंत्रण करतील
- तपासणी पथके पाळीनुसार कार्यरत राहतील
- वेगमर्यादेचे उल्लंघन, चुकीच्या मार्गिकेतून जाणे, लेन कटिंग, विनासीटबेल्ट, रस्त्याच्या कडेला बेकायदा पार्किंग इत्यादी प्रकार रोखणार
- महामार्गावरील ब्लॅकस्पॉट्‍सना वारंवार भेटी देऊन त्यांची दुरुस्ती करून घेण्यावर भर

महामार्ग पोलिसांची आकडेवारी काय सांगते?
- गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान एकूण १६९ अपघात
- त्यापैकी ६० जीवघेण्या अपघातांमध्ये ७४ प्रवाशांना जीव गमवावा लागला
- ४४ गंभीर अपघातांमध्ये ९६ प्रवासी गंभीर जखमी
- यंदा (२०२२) जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यानच्या दहा महिन्यांत १६८ अपघात
- त्यात ६८ जणांचा बळी
- ४२ गंभीर अपघातांमध्ये ९२ प्रवाशांना गंभीर दुखापत
- जीवघेणे अपघात सात टक्क्यांनी कमी
- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा महिन्यांत एकूण अपघाताच्या फक्त एक टक्का घट

अपघाताची कारणे
- द्रुतगती मार्ग वळणदार आणि चढत्या-उतरत्या स्वरूपाचा
- अवजड वाहनांच्या लेन कटिंगमुळे अपघात
- इतरही वाहतूक नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन