Vande Bharat Express
Vande Bharat Express Tendernama
पुणे

मोठी बातमी! पुण्यातून 'या' मार्गावर धावणार वंदे भारत एक्स्प्रेस?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यातून वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुणे विभागाच्या चालकांना वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याचे गाझियाबाद येथे प्रशिक्षण देखील सुरु झाले आहे. तर दुसरीकडे घोरपडीच्या कोचिंग डेपोमध्ये ‘वंदे भारत’साठी स्वतंत्र कव्हर्ड पीटलाइन देखील उभारली जाणार आहे. नुकतेच यासाठी नेमलेल्या एका खासगी संस्थेने याचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर देखील केला आहे.

भारतीय रेल्वेतील सर्वांत वेगवान समजली जाणारी वंदे भारत देशातील महत्त्वाच्या स्थानकावरून धावत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावरून नागपूर-बिलासपूर वंदे भारत सुरू झाल्यावर आता पुण्यातून ही धावणार असल्याचे निश्चित झाले आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने अधिकृत घोषणा केली नसली तरी त्या दृष्टीने मात्र प्रयत्न सुरु झाले आहे.
पुणे रेल्वे विभागातील चालकांना गाझियाबाद येथे वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याचे १८ दिवसांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. चालकांच्या एका तुकडीचे हे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे. दुसरी तुकडी देखील लवकरच जात आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या कॅबमध्ये अनेक व नावीन्यपूर्वक बदल केल्याने चालकांना प्रशिक्षण दिले जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने २०२३ या वर्षात देशातील विविध महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून सुमारे २५ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्धार केला आहे. यात पुण्यातून दोन रेल्वे सुरू होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. याचे मार्ग अद्याप ठरले नसले तरीही मिळालेल्या माहिती नुसार पुणे-सिकंदराबाद व मुंबई-पुणे-सोलापूर अशी धावण्याची दाट शक्यता आहे.

पुण्यातील चालकांना वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. गाझियाबाद येथे एका तुकडीचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे. या संदर्भात आवश्यक ती अन्य कामे देखील विभागात सुरू झाली आहे.
- ज्वेल मॅकेन्झी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक व्यवस्थापक (परिचालन), पुणे