Airport Tendernama
पुणे

देशांतर्गत प्रवासासाठी मिळणार नवा फायदेशीर पर्याय; हेलिकॉप्टर, छोट्या विमानांची...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : देशाच्या विविध भूभागांमध्ये विमानतळ बांधणे कठीण आहे. तेथे हेलिकॉप्टर व छोट्या विमानांची सेवा फायदेशीर ठरते. येणाऱ्या काळात या सेवांचा विस्तार होणार असल्याने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वतंत्र संचालनालय तयार केल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.

देशात केवळ ३०० हेलिकॉप्टर

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय, राज्य सरकार, पवनहंस व फिक्की’ यांच्या संयुक्त विद्यमाने हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांवरील सातव्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्रालयाचे सचिव असंगबा चुबा आ, ‘फिक्की’चे आर. के, सिंग, डीजीसीएचे संचालक फैज अहमद किडवाई, एमएडीसीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे आदी उपस्थित होते.

नायडू यांनी सांगितले की, ‘सध्या देशात केवळ ३०० हेलिकॉप्टर आहेत. ब्राझीलमध्ये ६०० पेक्षा जास्त आहेत. देशात हेलिकॉप्टर वाहतुकीचे क्षेत्र खूप मोठे आहे. ते आणखी वाढविण्याची व त्याचे योग्य प्रकारे नियंत्रण करण्याची गरज आहे. संचालनालय तयार केल्याने हेलिकॉप्टर व छोटे विमान क्षेत्राला खूप मोठा फायदा होईल. देशात हेलिकॉप्टर व छोटे विमानांची वाहतुकीची संख्या वाढण्यास ही परिषद खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून शक्य ती मदत केली जाईल.’

टाटा-एअरबसची हेलिकॉप्टर निर्मिती सुरू

देशात सध्या एक हजार पेक्षा जास्त हेलीपॅड्स उपलब्ध आहेत. ही संख्या जगातील एकूण नागरी हवाई सेवांमध्ये फक्त एक टक्का असली तरी याचा अर्थ असा की, या क्षेत्रात अफाट संधी आणि मोठा विस्तारास वाव असल्याचेही नायडू म्हणाले.

नायडू यांचे मुद्दे
- देशांतर्गत प्रवासासाठी लघुविमान सेवा ही काळाची गरज असून, त्याचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने संसदेत लीजिंगसंबंधी विशेष विधेयक मंजूर
- यामुळे कंपन्यांना दीर्घ मुदतीसाठी विमान भाड्याने घेणे सोपे झाले आहे
- कंपन्यांचा खर्च सुमारे १० टक्क्यांनी कमी होणार, त्याचा फायदा प्रवाशांना होणार
- कर्नाटकात टाटा-एअरबसची हेलिकॉप्टर निर्मिती सुरू आहे
- नागपूरमध्ये नागरी आणि संरक्षणासाठी हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प लवकरच सुरू होणार
- उडान ५.१ आणि ५.२ योजनांत हेलिकॉप्टर मार्गांचा समावेश करण्यात आला आहे.
- आता पर्यंत ६२० मार्गांवर १.५ कोटी प्रवाशांनी 'उडान'चा लाभ घेतला.
- उडानच्या पुढील टप्प्यात १२० नवीन गंतव्यस्थानांवर ४.५ कोटींहून अधिक प्रवाशांना जोडले जाणार.
- हेलिकॉप्टरची निर्मिती भारतात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

नव्या आर्थिक संधी : मोहोळ
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. या क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. स्थानिक पातळीवर हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विविध यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. देशांतर्गत हवाई वाहतूक वाढल्यास निश्चितच नव्या आर्थिक संधी उपलब्ध होऊन व्यापार, उद्योग, पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. देशांतर्गत हवाई वाहतूक क्षेत्राला आणि हवाई कनेक्टिव्हिटी भक्कम करण्याच्या दृष्टीने ही परिषद दिशा देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.विकसित भारत २०४७ हा संकल्प भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी नागरिक हवाई वाहतूक क्षेत्र सज्ज असेल.’’