पुणे (Pune) : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी सध्याच्या भूसंपादन कायद्याशी सुसंगत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मोबदल्याचा योग्य पर्याय दिल्यास त्यावर सरकार विचार करेल, असेही ते म्हणाले.
महसूल लोअदालतीच्या उद्घाटनानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुरंदर विमानतळाचे सर्वेक्षण थांबले आहे. योग्य मोबदल्याचे पॅकेज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, त्यावर विचारले असता बावनकुळे म्हणाले की, शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, तसेच त्यांचे नुकसान होणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. पुरंदर विमानतळ होणे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विमानतळाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून आहे, तो निकाली काढायचा आहे.
शेतकऱ्यांनी योग्य पॅकेजची मागणी केल्यास सध्याच्या भूसंपादन कायद्याशी बसवून पूर्ण करता येईल. विमानतळाबाबत काही लोक सकारात्मक, तर काही नकारात्मक आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मध्यम मार्ग काढू, असे बावनकुळे म्हणाले.
‘एक जिल्हा-एक नोंदणी’ उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यात सुमारे १४ हजार ४०० दस्तनोंदणी झाली आहे. याबाबत कोणतीही तक्रार नोंदणी विभागाकडे आली नसल्याचेही बावनकुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.