पिंपरी (Pimpri) : पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) ठेकेदाराच्या ४०० सीएनजी बस दाखल होणार आहेत. पण, या बसमध्ये चालक आणि वाहकही ठेकेदाराचे असणार आहेत. त्यामुळे बसगाड्यांपाठोपाठ आता चालक आणि वाहकही कंत्राटी असणार आहेत. त्यामुळे ‘पीएमपीएमएल’ची वाटचाल खासगीकरणाकडे सुरू असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत ‘पीएमपी’चे एकूण ३८१ मार्ग आहेत. त्यावर साधारण १, ७०० च्या आसपास बस दररोज धावतात. यापैकी ८००-८५० बस ठेकेदारांच्या, तर ७५०-८०० बस ‘पीएमपी’च्या धावतात. पीएमपीएमएलने चलनखर्च कमी करण्यासाठी २००० मध्ये ठेकेदारांच्या १५० बस घेण्याचा निर्णय घेतला होता. टप्याटप्याने ठेकेदारांच्या बसची संख्या वाढत गेली. सध्या ताफ्यात ठेकेदारांच्या ९२५ बस आहेत. आणखी ४०० सीएनजी बस दाखल होणार आहेत. आतापर्यंत ठेकेदाराच्या बसवर चालक ठेकेदाराचा आणि वाहक ‘पीएमपीएमएल’चा असायचा. मात्र, आता पीएमपीएमएलने जीसीसी मॉडेलवर नवीन येणाऱ्या ४०० बसवर चालकांबरोबरच वाहकही ठेकेदारांचे नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
फेब्रुवारीअखेर बस येणार
‘पीएमपीएमएल’ने ऑक्टोबर २०२४ मध्ये श्री बालाजी रोडा लाईन्स ९३ बस, मे. वैष्णवी ट्रान्सपोर्ट ९३ बस, मे तिरुपती ट्रॅव्हल्स ॲण्ड गुड्स सर्व्हिसेस ९३ बस आणि मे. ॲन्टोनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्सुशन्स १२१ बसचा करार केला आहे. या बस फेब्रुवारीअखेर ताफ्यात दाखल होण्यास सुरवात होणार आहे.
चालकांवर नियंत्रण कोणाचे?
बसबरोबर चालकही ठेकेदारांचे नेमण्याचा पहिल्यांदा निर्णय २००० मध्ये घेण्यात आला होता. ठेकेदारांच्या चालकांची संख्या वाढत गेली. त्यांना वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे एकाच वेळी ठेकेदारांच्या सर्व चालकांनी काम बंद आंदोलन करण्याच्या घटना घडल्या आहेत. या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला होता. चालकांकडून बेदरकारपणे बस चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे असेही प्रकार झाले आहेत. त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते.
प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय?
बसमध्ये प्रवाशांसोबत वर्तन नीट केले नाही, तर कामावरून काढून टाकण्याची भीती वाहकांमध्ये असायची. मात्र, आता ठेकेदारांचे वाहक येणार आहेत. ते कंत्राटी असल्यामुळे वर्तन नीट नसल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न आहे.
‘पीएमपीएमएल’मध्ये ठेकेदारराज
बस, बसची देखभाल दुरुस्ती, तिकीट मशिन, थांबे, चालक, वाहक, सुरक्षा कर्मचारी या सेवा ठेकेदारांकडून घेतले जात आहेत. त्यामुळे ‘पीएमपीएमएल’मध्ये ठेकेदारराज उदयास आले आहे, अशी चर्चा आहे.
कोणत्या आगारात किती बस येणार
आगार - बस संख्या
हडपसर - ९३
न.ता.वाडी - ९३
भेकराईनगर - ३३
शेवाळवाडी - ३०
पुणे स्टेशन - ३०
भोसरी - ६३
बालेवाडी - ३८
बाणेर - २०
‘‘पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारीअखेर नवीन सीएनजी बस दाखल होण्यास सुरवात होणार आहे. करारानुसार बसवर चालक आणि वाहन ठेकेदाराचे असणार आहेत.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल