Ring Road Tendernama
पुणे

रावेत व पुनावळे सेवा रस्ता भूसंपादनाच्या खर्चास मंजुरी

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गालगतचा सेवा रस्ता १२ मीटरचा केला जाणार आहे. त्यासाठी रावेत व पुनावळे येथील भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चास महापालिका सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

महापालिका सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजुरी दिली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदींसह संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. बाह्यवळण मार्ग ६० मीटर रुंद आहे. त्याच्या दोन्ही बाजूस १२ मीटर रुंद सेवा रस्ता प्रस्तावित आहे. काही ठिकाणी सेवा रस्त्याचे काम झाले असून, तो कार्यान्वित आहे. मात्र, रावेत व पुनावळे भागात भूसंपादन झालेले नाही. त्याविषयीचा ठराव ऑगस्ट महिन्यातील सभेत मंजूर आहे. आता भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यात नुकसान भरपाई, सर्वेक्षण, मोजणी अशा खर्चाचा समावेश आहे.

चिंचवड व थेरगाव यांना जोडणारा पवना नदीवरील पूल अर्थात आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजनेनुसार सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

अन्य मंजूर विषय...
- प्रभाग २५ मध्ये नवीन जलवाहिन्या टाकणे व व्हॉल्व बसविण्यासाठी ६१ लाख रुपये
- चिंचवड स्टेशन रामनगर परीसरातील महापालिका शाळा इमारती दुरुस्तीसाठी ४१ लाख रुपये
- भोसरीतील सर्वे क्रमांक एकमध्ये प्रेक्षक गॅलरी व मैदान विकसित करण्यासाठी ७ कोटी रुपये