
पुणे (Pune) : रेंजहिल्स डेपो ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यानच्या (Range Hills Depot To Shivajinagar Court Underground Metro) भुयारी मार्गातून मेट्रोची चाचणी मंगळवारी यशस्वी झाली. आता गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यानचा मेट्रो मार्ग कधी खुला होणार, याची पुणेकरांना उत्सुकता लागली आहे.
मेट्रो प्रकल्पात पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या १७. ४ किलोमीटरच्या मार्गात शिवाजीनगर ते स्वारगेट हा सहा किलोमीटरचा टप्पा भुयारी आहे. त्यातील रेंजहिल्स डेपो ते रेंजहिल्स एलिव्हेटेड स्थानक आणि तेथून शिवाजीनगर न्यायालय स्थानका दरम्यान तीन किलोमीटरची चाचणी मंगळवारी दुपारी झाली. सुमारे ३० मिनिटे ही चाचणी चालली.
मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी हा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून तो पार पडला आहे. तसेच, शहर आणि पिंपरी चिंचवड प्रकल्पातील मेट्रोचे काम ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे, असे महामेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले. या चाचणीसाठी गेल्या आठवड्यापासून मेट्रोचे ट्रॅक, विद्युत, सिग्नलिंग, देखरेख व संचालन असे सर्व विभाग सतत कार्यरत होते. चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार पार पडल्याचे ‘महामेट्रो’ने स्पष्ट केले. मेट्रोसाठीच्या भुयारी मार्गाचे काम ४ जून रोजी पूर्ण झाले.
आजची भूमिगत मेट्रो चाचणी ही तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि किचकट होती. यासाठी पुणे मेट्रोचे कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत होते. पुणे मेट्रोचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून, ए-एक टप्पा पार पाडत ती पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. येत्या काही महिन्यांत फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय आणि गरवारे ते शिवाजीनगर न्यायालय या मार्गांची कामे पूर्ण करून तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो