पुणे (Pune) : पुणे हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. देशातील ३५ शहरे विमानसेवेने जोडली आहेत. तीन आंतरराष्ट्रीय विमानांच्या माध्यमातून परदेशातील तीन शहरे पुण्याशी जोडले आहेत. मात्र, राज्याचा विचार करता केवळ चार शहरे पुण्याला विमानसेवेने जोडली आहेत. अनेकांना पुणे गाठण्यासाठी रस्ते, रेल्वेचा आधार घ्यावा लागतो. ती शहरे विमानसेवेने पुण्याशी जोडल्यास त्या शहरांचाही विकास होण्यास मदत होईल. प्रवाशांच्या वेळेतही बचत होईल.
पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी दोन टर्मिनल उपलब्ध आहेत. शिवाय धावपट्टी विस्तारण्याचाही प्रस्ताव आहे. येत्या काळात पुणे विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढही होणार आहे. असे असले, तरीही पुणे विमानतळ राज्यातील केवळ मोजक्याच शहरांशी विमानाने जोडले आहे. राज्याच्या विविध शहरांतून दररोज अनेक नागरिक विविध कामांसाठी दाखल होतात. कोणी रात्रभर प्रवास करून येतो, तर कोणी पूर्ण दिवस प्रवासातच घालवतो. ज्या शहरांत विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे, त्या शहरांतून पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणे प्रवाशांच्यादृष्टीने आवश्यक आहे. यामुळे केवळ प्रवाशांच्या वेळेतच बचत होणार नाही, तर त्या शहरांच्या विकासालादेखील हातभार लागणार आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांपासून ते राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.
विमानतळांचा विकास गरजेचा :
देशात हवाई वाहतूक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. त्यानुसार येणाऱ्या काळात विमानतळ आणि विमानांच्या संख्येतही वाढ होणार आहे. येत्या चार ते पाच वर्षांत विमानांची संख्या १६०० होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास एवढ्या विमानांचे पार्किंग कुठे करायचे? असा प्रश्न निर्माण होईल. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात विमान पार्किंगला जागा नाही. तेव्हा अशी विमाने पार्किंगसाठी छोट्या विमानतळावर ठेवावे, असा विचार हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सुरू आहे.
येथे विमानतळ कार्यान्वित :
मुंबई, पुणे, कोल्हापूर, शिर्डी, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बारामती, नागपूर.
पुण्याशी जोडलेली शहरे :
नांदेड, सिंधुदुर्ग, जळगाव, नागपूर.
विमानतळ आहे, पण सेवा नाही :
सोलापूर, अकोला (शिवणे), यवतमाळ, लातूर, चंद्रपूर, गोंदिया, धाराशिव, धुळे.
देशातील स्थिती
विमानतळ : १५७
विमाने : सुमारे ८००
‘‘केवळ पुण्याच्या प्रगतीसाठी नाही, तर राज्यातील अन्य छोट्या शहरांच्या विकासासाठीदेखील विमानसेवेने जोडणे आवश्यक आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर त्या शहराचा आर्थिक विकास होईलच. शिवाय पायाभूत सुविधादेखील उपलब्ध होतील.’’
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ