Satara Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यातील 'त्या' महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाला का लागला ब्रेक? टेंडर प्रक्रियेकडे सरकार दुर्लक्ष करतेय का?

Satara Government Medical Collage News

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : सातारा शासकीय मेडिकल कॉलेजचे काम निधी मंजुरीअभावी रखडले आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी टेंडर (Tender) प्रक्रियेकडेही राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

सध्या ज्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू आहे, त्या इमारतीत महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची जागा असून, या रुग्णालयाला मंजुरी मिळून निधीही उपलब्ध झाला आहे. केवळ मेडिकल कॉलेजचे काम रखडल्याने महिला रुग्णालयाच्या कामाला ब्रेक लागला आहे.

शासनाने तातडीने दुसऱ्या टप्प्यातील निधी मंजूर करून मेडिकल कॉलेजच्या कामाला गती द्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

सातारा शासकीय मेडिकल कॉलेजचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, सध्या दुसऱ्या टप्प्यातील कामांची टेंडर प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे हे काम खोळंबले आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमदार शिंदे म्हणाले, ‘‘मी मंत्री असताना पाच शासकीय मेडिकल कॉलेजला मंजुरी दिली होती. त्यानंतर नंदूरबार, बारामतीची मेडिकल कॉलेज सुरू झाली; पण सातारा मेडिकल कॉलेजचे काम अद्यापही सुरूच आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कॉलेजच्या कामाने वेग घेतला होता. त्यानंतर काहींनी पैशाच्या लाभापोटी कामे बंद पाडली. त्यामुळे या कामांचा वेग मंदावला.

राज्य शासनाने निधीची तरतूद केली; पण निधी उपलब्धतेकडे दुर्लक्ष केले आहे. आता या कामांसाठी निधी कमी पडू लागल्याचे चित्र आहे. सध्या कॉलेजच्या दुसऱ्या टप्प्यातील ३५० कोटींच्या कामांना मंजुरी दिली गेली आहे; पण टेंडर प्रक्रियेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. यामध्ये इतर कामांसाठी १५० कोटी व इमारतीच्या कामांसाठी २०० कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे.

कालवा बंदिस्त करून त्यावर रस्ता करण्यासाठीचा प्रस्ताव कृष्णा खोऱ्यातून मंजुरीसाठी पाठविलेला आहे; पण सध्या दुसऱ्या टप्प्यातील कामांच्या टेंडरकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे, असे शिंदे म्हणाले.

...तर आंदोलन करणार
सध्या ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे वर्ग भरतात, ती जागा ही महिलांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाची आहे. महिला रुग्णालयासाठी स्टाफ, इतर पदे मंजुरी केलेली आहेत. निधीही मंजूर केलेला आहे; पण केवळ मेडिकल कॉलेज या ठिकाणी भरत असल्याने या रुग्णालयाचे काम दोन वर्षांपासून सुरू करता येत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता करावी.

नवीन जागेत मेडिकल कॉलेज किमान डिसेंबरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा आम्हाला महिला रुग्णालयासाठी वेगळी भूमिका घेत आंदोलन करावे लागेल, असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला.