Railway Track Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

पुणे-अहिल्यानगर थेट रेल्वेमार्गाबाबत काय आली गुड न्यूज?

New Railway Line : हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. रस्त्याने जाताना शिरूर, शिक्रापूरमध्ये मोठी वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो. ही थेट कनेक्टिव्हिटी वाढून विकासाला चालना मिळणार आहे.

टेंडरनामा ब्युरो

अहिल्यानगर (Ahilyanagar) : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. तसेच साईनगर (शिर्डी) ते पुणतांबा आणि साईनगर (शिर्डी) ते नाशिक या थेट या मार्गासाठी ही मंजुरी दिली आहे. (Pune To Ahilyanagar Railway Line)

नाशिक - साईनगर शिर्डी (८२ किलोमीटर), पुणे - अहिल्यानगर (१२५ किलोमीटर), नवीन दुहेरी ट्रॅक आणि साईनगर शिर्डी - पुणतांबा (१७ किलोमीटर) नवीन दुहेरी ट्रॅक अशा तीन रेल्वे प्रकल्पांसाठी सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर डीपीआर तयार केला जाईल.

पुणे आणि नाशिक यांच्या थेट जोडणीसाठी डीपीआर महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने तयार केला आहे. महाराष्ट्र सरकार ५० टक्के आणि रेल्वे मंत्रालय ५० टक्के यांचा संयुक्त उपक्रम असल्याचे वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले होते.

हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. रस्त्याने जाताना शिरूर, शिक्रापूरमध्ये मोठी वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो. ही थेट कनेक्टिव्हिटी वाढून विकासाला चालना मिळणार आहे.

दौड-मनमाडचे दुहेरीकरण अंतिम टप्प्यात

अहिल्यानगर शहर-पुणे-नाशिक दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी २४८ किलोमीटर लांबीच्या दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणास मान्यता देण्यात आली आहे. २४८ किलोमीटरपैकी १७८ किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७० किलोमीटरचे काम प्रगतीपथावर आहे.

छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे

हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मार्गामुळे वाळूज, रांजणगाव, शेंद्रा, सुपा, चाकण या औद्योगिक वसाहतींना मोठा फायदा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे अशा थेट रेल्वेमार्गाचीही मागणीही अनेक वर्षांपासून होत आहे. हा मार्ग झाल्यास कनेक्टिव्हिटी वाढून विकासाला चालना मिळेल.

रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अहिल्यानगर - पुणे, अहिल्यानगर - नाशिक नवीन रेल्वे मार्गाने जोडला जाईल. यामुळे अहिल्यानगरच्या विकासाला गती मिळेल.

- सुदर्शन डुंगरवाल, मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य