Ram Shinde Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Tukai Lift Irrigation: कर्जतचा पाणीप्रश्न सुटणार; 'ती' कामे 15 जुलैपूर्वी पूर्ण करा

कुकडी कालव्यातून १९ गावांना मिळणार हक्काचे पाणी; मिरजगावच्या भैरवनाथ उपसा योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव ऑगस्टअखेर सादर करण्याच्या प्रा. राम शिंदे यांच्या सूचना

टेंडरनामा ब्युरो

अहिल्यानगर (Ahilyanagar): अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोरड्या जमिनीला आणि शेतकऱ्यांना तातडीने सिंचनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे येत्या १५ जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत. या योजनेमुळे तालुक्यातील १९ गावांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची हक्काची सुविधा उपलब्ध होणार असून, मुख्यमंत्र्यांचे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे विशेष लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवर्षणप्रवण आणि दुष्काळी भागाला शाश्वत पाण्याचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने जलसिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग दिला आहे. कर्जत आणि जामखेड परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 'तुकाई उपसा जलसिंचन' आणि 'भैरवनाथ उपसा जलसिंचन' योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुंबईतील विधानभवनात एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, पुण्याचे मुख्य अभियंता नितीन दुसाने, तापी गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय दाहेदार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तुकाई योजनेचे काम ९० टक्के पूर्ण
बैठकीत तुकाई योजनेच्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत असताना, हा प्रकल्प भौतिकदृष्ट्या सुमारे ९० टक्के पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामध्ये मुख्य पंपगृह आणि उर्ध्वगामी नलिकेचे काम तब्बल ९८ टक्के पूर्ण झाले असून, शेतातील पाणी वितरणाचे काम ७२ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी उर्वरित १० टक्के कामे वन्यजीव विभागाच्या सर्व आवश्यक परवानग्यांसह १५ जुलैच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून जुलैच्या मध्यातच या योजनेचा रीतसर शुभारंभ करता येईल. कुकडी डाव्या कालव्यातून उपसा करून कर्जत तालुक्यातील १९ गावांना या योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही आणि सर्व यंत्रणांनी कालबद्ध पद्धतीने व समन्वयाने काम करावे, अशी ताकीद यावेळी देण्यात आली.

भैरवनाथ उपसा योजनेचा प्रस्ताव ऑगस्टअखेर सादर होणार
मिरजगाव परिसरातील आवर्षणप्रवण भागासाठी आखण्यात आलेल्या भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेवरही बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सीना कालव्यातून पाणी उपसा करून परिसरातील १२ मोठे बंधारे भरण्याचे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या योजनेअंतर्गत अद्ययावत पंपगृह, वितरण वाहिन्या आणि वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाचे सर्वेक्षण, आरेखन आणि तांत्रिक बाबी पूर्ण करून याचा परिपूर्ण प्रस्ताव ऑगस्टअखेरपर्यंत मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करण्याचे आदेश सभापती आणि जलसंधारण मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या दोन्ही योजना पूर्णत्वास गेल्यास कर्जत आणि मिरजगाव परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

Key Points Summary

  • तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश.

  • कुकडी डाव्या कालव्यातून कर्जत तालुक्यातील १९ गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध होणार.

  • प्रकल्पाचे मुख्य काम ९० टक्के पूर्ण झाले असून, पंपगृहाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे.

  • सिन्नर आणि वन्यजीव विभागाच्या तांत्रिक परवानग्या तातडीने मिळवून जुलैमध्येच योजनेचा शुभारंभ करण्याचे नियोजन.

  • मिरजगावच्या भैरवनाथ उपसा योजनेचा परिपूर्ण तांत्रिक प्रस्ताव ऑगस्टअखेर सादर करण्याच्या सूचना.

  • सीना कालव्यातून पाणी उपसा करून भैरवनाथ योजनेद्वारे १२ मोठे बंधारे भरले जाणार.