अहिल्यानगर (Ahilyanagar) : शहरात ठिकठिकाणी अनधिकृत फ्लेक्स बोर्ड, बॅनर, होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी व महानगर दंडाधिकारी म्हणून महानगरपालिका आयुक्त यांनी सदरचे बेकायदा फलकावर तत्काळ कारवाई करावी. अन्यथा, न्यायालयाचा अवमान याचिका दाखल करण्याची नोटीस ॲड. दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, उच्च न्यायलयाने बेकायदेशीर आणि अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची जबाबदारी जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, तर महानगरपालिका हद्दीमध्ये महानगरपालिका आयुक्तांवर सोपविली आहे.
उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ अन्वये १८ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निकालानंतर नगरपरिषद महापालिका क्षेत्रात बेकायदा अनाधिकृत जाहिरात पोर्टस, बॅनर्स, होर्डिंग्स लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येईल, अशा बेकायदा अनधिकृत जाहिराती, पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग उभारण्यास पूर्णपणे बंदी घातलेली आहे. मात्र, विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांनी विजयाचे, तर काहींनी मतदारांचे आभाराचे फलक लावले आहेत.
काही कार्यकर्त्यांनी ही विजयी उमेदवारांचे फलक लावले आहेत. याबाबत योग्य ती कारवाई करावी. अन्यथा, आपल्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असे नोटिशीत ॲड. वाघमारे यांनी नमूद केले.