CCTV Camera Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : जिल्हा परिषदेच्या 394 प्राथमिक शाळांत लवकरच सीसीटीव्ही; टेंडर प्रक्रिया पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटी १० लाखांचा निधी मिळाला आहे. यासाठी काढलेल्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार ठेकेदाराकडून ३९४ शाळांमध्ये त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू झाले असून, लवकरच कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे त्या शाळांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.

बदलापुरातील घटनेनंतर २१ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. जिल्हा वार्षिक योजनेतून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी तीन कोटी १० लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्याच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शाळा सुटीचे दिवस वगळता चार महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

गरज ५५ कोटींची, मिळाले तीन कोटी

जिल्हा परिषदेच्या एकूण दोन हजार ७७७ प्राथमिक शाळा आहेत. प्रत्येक शाळेत आठ सीसीटीव्ही बसविण्यासाठी अंदाजे ५५ कोटींची गरज आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी केवळ तीन कोटी १० लाखांचा निधी दिला आहे.

मुलींच्या सर्व ३७ शाळांत सीसीटीव्ही

जिल्हा परिषदेच्या मुलींच्या ३७ शाळा आहेत. त्यांच्यासह १०० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या ३५७ शाळांमध्ये प्राधान्याने सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. तसेच २०० शाळांमध्ये सीएसआर निधीतून सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

सीसीटीव्ही बसविण्यात येणाऱ्या शाळांची तालुकानिहाय संख्या

- उत्तर सोलापूर : : २७

- दक्षिण सोलापूर : : ६१

- अक्कलकोट : : ४४

- बार्शी : : २७

- मोहोळ : : ५६

- मंगळवेढा : : २४

:- पंढरपूर : : ३३

- सांगोला : : २२

- करमाळा : : २३

- माढा : : २९

- माळशिरस : : ४८

- एकूण : : ३९४.

जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळाला आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. लवकरच सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला सुरवात होईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर