बेळगाव (Belgaum) : जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषद व नगरपालिकांचे कार्यक्षेत्र एलईडी दिव्यांनी उजळणार आहे. जिल्ह्यात एकूण ३८ नगर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या सर्व ठिकाणी रस्त्यांवर एलईडी दिवे लावले जाणार आहेत.
पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप या तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे. एनर्जी एफिसीयन्सी प्रोजेक्ट या नावाने ही योजना राबविली जाईल. ही योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांकडून टेंडर मागविण्यात आले आहेत. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नगरविकास योजना विभागाकडून हे टेंडर काढण्यात आले आहे. यासाठी टेंडर दाखल करण्याची अंतिम तारीख २ मार्च आहे. ४ मार्चला टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याआधी एकदा या योजनेसाठी टेंडर मागविण्यात आली होती, पण त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता दुसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले आहे.
जिल्ह्यातील बेळगाव महापालिका वगळता सर्व नगर स्थानिक स्वराज्य संस्था नगरविकास योजना विभागाच्या अख्त्यारीत येतात. जिल्ह्यात त्यांची संख्या ३८ इतकी आहे. त्यात निपाणी, संकेश्वर या मोठ्या नगरपालिकांचाही समावेश आहे. या नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात सध्या सोडीयम वेपर किंवा मर्क्युरी दिवे आहेत. म्हणजे तेथील रस्त्यांवरी सर्वच खांबांवर हे दिवे आहेत. पण त्या दिव्यांसाठी विजेचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे विजबिलापोटी मोठी रक्कम हेस्कॉमला द्यावी लागते. शिवाय ते दिवे लवकर खराब होतात, त्यामुळे वारंवार बदलावे लागतात. पथदीपांच्या देखभालीचा ठेका द्यावा लागतो, त्यासाठी लाखो रूपये निधी खर्च केला जातो. एलईडी दिवे लावले तर वीजेची बचत होणार आहे. शिवाय एलईडी दिवे लगेच खराब होत नसल्यामुळे ते बदलावे लागणार नाहीत. त्यासाठीच ३८ नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात एलईडी दिवे लावले जाणार आहेत.
बेळगाव शहरात स्मार्ट सिटी विभागाकडून ही योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी ठेकेदारही नियुक्त करण्यात आला आहे. एलईडी दिव्यामुळे विजबिलात ५४ टक्के बचत होणार आहे. ती बचत होणारी रक्कम ठेकेदाराला दिली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. बेळगाव शहराच्या धर्तीवरच जिल्ह्यातील ३८ ठिकाणी ही योजना राबविली जाईल. ज्या कंपनीला हा ठेका मिळेल त्या कंपनीला स्वखर्चातून एलईडी दिवे बसवावे लागतील. त्यांची देखभाल करावी लागेल. विजबिलाच्या बचतीतून जी रक्कम मिळेल ती कंपनीला दिली जाईल. बेळगाव शहरात ही योजना राबविण्याआधी हेस्कॉम व स्मार्ट सिटी विभागाकडून एनर्जी ऑडीट करण्यात आले होते. त्यात ५४ टक्के विजबिल बचत होईल असे स्पष्ट झाले होते. ठेकेदार मिळाला तर चार महिन्यानंतर ३८ नगरे एलईडी दिव्यांनी उजळून निघतील.