सोलापूर (Solapur) : महाराष्ट्रातील सर्व विभागात अलीकडे छोट्या विकास कामांचे एकत्रीकरण करून मोठ्या टेंडर प्रक्रिया राबविण्याचे धोरण अवलंबिले आहे. हे संपूर्ण चुकीचे असल्याचे सांगत सोलापूर महापालिकेत छोट्या कामांचे एकत्रीकरण करू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केली आहे.
महापालिकेचे उपअभियंता प्रकाश दिवाणजी यांना याबाबतचे निवेदन कंत्राटदार महासंघाने दिले आहे. छोट्या कामांचे एकत्रीकरण करू नये, कारण ते छोट्या कंत्राटदार व त्यांच्या कुटुंबांचे उपजिविकेचे साधन आहे. यासाठी शासनाने या घटकांवर अन्याय करू नये व छोट्या कामांचे एकत्रीकरण करू नये, असा स्पष्ट आदेश २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने एका याचिकेत दिला आहे.
या आदेशानंतर शासनानेही याबाबतचा शासन निर्णय घेतला आहे. तरी देखील काही विभाग छोट्या कामांचे एकत्रिकरण करत असल्याचे या वेळी निदर्शनास आणून दिले.
याप्रसंगी निवेदन देताना महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजिनिअर मिलिंद भोसले, सोलापूर जिल्हा लेबर फेडेरेशन अध्यक्ष शंकरराव चौगुले, सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन अध्यक्ष रामभाऊ दुधाळ, ओम गर्जना वडार कंत्राटदार संघटना अध्यक्ष राजाभाऊ कलकेरी, चंद्रकांत घोडके, अभियंता संघटनेचे सचिव नरेंद्र भोसले, मारुती पवार आदी उपस्थिती होते.