Solapur Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : झेडपीने DPC कडे का केली आणखी 10 कोटींची मागणी?

Solapur ZP News : जिल्हा परिषदेच्या एकूण दोन हजार ७७७ प्राथमिक शाळा आहेत. प्रत्येक शाळेत आठ सीसीटीव्ही बसविण्यासाठी अंदाजे ५५ कोटींची गरज आहे.

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पहिल्या टप्प्यात ३९४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे आणखी १० कोटींची मागणी केली आहे.

बदलापुरातील घटनेनंतर २१ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. जिल्हा वार्षिक योजनेतून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी तीन कोटी १० लाखांचा निधी मिळाला. त्याच्या टेंडर प्रक्रियेनंतर ३९४ प्राथमिक शाळांत सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या एकूण दोन हजार ७७७ प्राथमिक शाळा आहेत. प्रत्येक शाळेत आठ सीसीटीव्ही बसविण्यासाठी अंदाजे ५५ कोटींची गरज आहे. २०० शाळांमध्ये सीएसआर निधीतून सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा वार्षिक योजना २०२५ - २६ मधून १० कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्य निधीतून पहिल्या टप्प्यात ३९४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित शाळांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे आणखी १० कोटींची मागणी केली आहे.

- कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर