सोलापूर (Solapur) : सोलापूर शहरासाठी एवढी मोठी समांतर जलवाहिनी योजना होत आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतरही जलशुद्धीकरण केंद्राअभावी पाण्याचे दिवस कमी होत नसतील ही गंभीर बाब आहे.
पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेसाठी निर्वनीकरणासाठी मी प्रयत्न करतो. यासाठी आवश्यक असलेला साडेनऊ कोटींचा निधी आपण सरकारकडून मिळवू, सरकारकडून निधी मिळाला नाही तर पाकणीतील जागा महापालिकेच्या मालकीची होणार असल्याने ही रक्कम भरण्याची तयारी महापालिकेने ठेवावी अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरातील पाणी पुरवठा, समांतर जलवाहिनीचे काम व पाकणी जलशुद्धीकरण केंद्राबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते.
पाकणीची जागा वनविभागाची असल्याने अडचण आहे. सोलापूर शहरातील तिन्ही आमदारांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यावर चर्चा करा, राज्य सरकारकडे आपण या संदर्भात पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दुहेरी जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर सोलापुरला रोज पाणी पुरवठा होईल, असे स्वप्न दाखविले जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरही जलशुद्धीकरण केंद्राअभावी नागरिकांना पाणी दिवसाआड मिळू शकत नसल्याचे समोर येऊ लागले आहे. यासाठी पाकणी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आवश्यक आहे. येथील जागा वनविभागाची असतानाही या केंद्रासाठी टेंडर काढण्याचा पराक्रम झाला आहे. वनविभागाच्या जागेचा तिढा सोडवावा, या केंद्रासाठी आवश्यक निधी महापालिकेला मिळावा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
- देवेंद्र कोठे, आमदार, भाजप
जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहरासाठी वाढीव पाणी मिळेल परंतु पाणी पुरवठ्याचे दिवस कमी करण्यासाठी पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. येथील केंद्रासाठी आवश्यक असलेला निधी व वन जमिनीचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. पाकणीतील जागेच्या निर्वनीकरणासाठी आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील सहा हेक्टर पर्यायी जागा सुचविण्यात आली आहे.
- शीतल तेली-उगले, आयुक्त, महापालिका