सोलापूर (Solapur) : भीमा नदीवर बठाण (ता. मंगळवेढा) येथे गाळमिश्रित वाळूचा ठेका बूबनाळ (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील प्रशांत लक्ष्मण शहापुरे यांना मिळाला होता. ठेका देताना जिल्हा प्रशासनाने घातलेल्या अटी व शर्थींचे पालन झाले नाही. काही दिवस ठेका स्थगित केल्यानंतरही सुधारणा न झाल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बठाणचा वाळू ठेका १४ मे रोजी कायमस्वरूपी रद्द केला आहे. या ठेक्यासाठी भरलेली ४० लाखांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
या ठेकेदाराने नदीपात्रातून वाळू डेपोपर्यंत वाहतूक करण्यात येणाऱ्या वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत, नदीपात्रातून ते वाळू डेपोपर्यंत वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची स्क्रीन यंत्रणा मंगळवेढ्याच्या तहसीलदार कार्यालयात कार्यान्वित केली नाही. गाळ मिश्रित वाळू घाटातून भरल्यापासून ते डेपोपर्यंत साठा करेपर्यंत वाहन सीसीटीव्हीच्या कक्षेत राहील अशी सूचना केली नाही, नदीपात्रातून ते वाळू डेपोपर्यंत वाहतूक करणाऱ्या काही वाहनांवर नोंदणी क्रमांक नसल्याचे दिसले, वाळू डेपो साठवणुकीच्या ठिकाणी वाळू डेपोला काटेरी तारेचे कुंपण घातले नाही, वाळू डेपोमध्ये सुरक्षा रक्षक/सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नव्हती. वाळू डेपोमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर वाळू डेपोतील कामकाजावर परिणाम होवू नये म्हणून जनरेटर किंवा इतर कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही, वाळू डेपोमध्ये वाळू टाकण्यापूर्वी तसेच वाळू डेपोमधून ग्राहकांना वाळू विक्री केल्यानंतर शासकीय यंत्रणांना महाखनिज प्रणालीव्दाई एसएमएस अलर्ट जाईल, अशी व्यवस्था केली नाही, रेती/वाळूच्या केलेल्या उत्खननाचे परिमाण विवरणपत्र दर महिन्याच्या १० तारखेला सादर केले नाही, वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची माहिती सादर केली नाही, असा ठपका ठेवून हा ठेका रद्द करण्यात आला आहे.
नऊ ठेक्यांसाठी टेंडर प्रक्रिया
अक्कलकोट तालुक्यातील खानापूर येथून १७ हजार २४४ ब्रास व देवीकवठे येथून १३ हजार २५१ ब्रास, मोहोळ व मंगळवेढ्यातील मिरी-तांडोर येथून १५ हजार ७१० ब्रास, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथून १४ हजार ८४१ ब्रास व लवंगी येथून ८ हजार ११० ब्रास, माढा तालुक्यातील आलेगाव खु. येथून १७ हजार ७० ब्रास, टाकळी टें. येथून १६ हजार ७८४ ब्रास व गारअकोले येथून १६ हजार ६९६ ब्रास व पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथून १३ हजार ३८७ ब्रास वाळू उपसा करण्यासाठी पर्यावरण समितीने मान्यता दिली आहे. या नऊ वाळू ठिकाणांमधून एक लाख ३३ हजार ९३ ब्रास वाळू उपसा करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. लवकरच ही टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.