Pandharpur Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : विठुरायाचे दर्शन आता आणखी होणार सुलभ; 'त्या' कामांसाठी 102 कोटींचे टेंडर

Pandharpur : अध्यात्मिक पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून सोलापूर जिल्ह्याकडे पाहिले जाते.

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक सुलभपणे दर्शन व्हावे यासाठी पंढरपुरातील पत्राशेडचा पुनर्विकास, दर्शन मंडप आणि स्काय वॉक बांधला जाणार आहे.

या कामासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेतला आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १०२ कोटी ७३ लाख रुपयांचे टेंडर काढले आहे.

या कामाचे टेंडर २४ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन टेंडर उघडण्यास मुदत देण्यात आली आहे. सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता टेंडर उघडल्या जाणार आहेत. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला पावसाळ्यासह २४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना तत्काळ व सुलभ दर्शन व्हावे, दर्शनासाठी थांबणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे.

अध्यात्मिक पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून सोलापूर जिल्ह्याकडे पाहिले जाते. सोलापूर जिल्ह्यात विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरला येणारा भाविक, स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येणारा भाविक जिल्ह्यातील इतर प्रमुख देवस्थानाकडे जावा यासाठी जिल्ह्यातील पाच मंदिरांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहे.

या शिवाय उजनी येथे जलपर्यटन साकारले जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना मिळावी, जिल्ह्यातील तरुणांना याच जिल्ह्यात पर्यटनावर अधारित रोजगार व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

या कामाच्या टेंडरमध्ये ठेकेदाराला पावसाळ्यासह २४ महिन्यांचा कालावधी दिला आहे. सध्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. येथील कामासाठी प्रिकास्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक वर्षात, साधारणता मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आषाढी वारीच्या आगोदर या कामाची मोठी प्रगती झालेली दिसेल.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर