Airport Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Airport : सोलापूर-गोवा विमानसेवेचा मुहूर्त अखेर ठरला !

Goa, Mumbai Flights From Solapur : ‘डीजीसीए’ने सोलापूर विमानतळाचा पहिला ‘समर शेड्यूल’ जाहीर केला आहे

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गेल्या सहा महिन्यांपासून सोलापूरची विमानसेवा अनिश्चितेच्या गर्तेत घिरट्या मारीत होती. मात्र आता अनिनिश्चितचे ‘ढग’ बाजूला सारून विमानसेवा उड्डाणाच्या दिशेने झेपावणार आहे. (Solapur Goa, Solapur Mumbai Flight From Solapur Airport)

‘डीजीसीए’ने सोलापूर विमानतळाचा पहिला ‘समर शेड्यूल’ जाहीर केला आहे. यात सोलापूर ते गोवा व सोलापूर ते मुंबई या दोन सेक्टरचा उल्लेख केला आहे. मात्र सोलापूर ते मुंबई सेक्टरसाठी विमानसेवेची टेंडर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने सोलापूर - मुंबई विमानसेवेला आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सोलापूर - गोवा ही विमानसेवा सुरु होणार आहे. एप्रिल अखेरीस अथवा मेच्या पहिल्या आठवड्यात गोव्यासाठी उड्डाण होण्याची शक्यता आहे.

‘फ्लाय ९१’ या विमानकंपनीच्या एटीआर - ७२ या विमानाला ‘डीजीसीए’ने (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) नुकतीच मंजुरी दिली. ‘डीजीसीए’ने जाहीर केलेल्या समर शेड्यूल मध्ये दाबोलीम (गोवा) ते सोलापूर दैनंदिन विमानसेवेचा उल्लेख केला आहे. प्रसिद्ध केलेला समर शेड्यूल हा २५ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. याच शेड्यूलमध्ये सोलापूर - मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

असे आहे गोव्याचे वेळापत्रक

रविवारी

फ्लाइट क्रमांक आयसी १४०२

- गोव्याहून सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी सोलापूरसाठी उड्डाण

- सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी सोलापुरात दाखल.

सोमवार ते शनिवार

फ्लाइट क्रमांक आयसी १४०१

- गोव्याहून सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सोलापूरसाठी उड्डाण

- सोलापुरात ८ वाजून ५५ मिनिटांनी दाखल.

टेंडर प्रक्रियेमुळे मुंबईचे उड्डाण लांबणीवर

सोलापूर - मुंबई या सेक्टरवर अद्याप कोणती विमान कंपनी सेवा देणार हे अधिकृतरीत्या ठरलेले नाही. यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) टेंडर प्रक्रिया राबवीत आहे. ‘एमएडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोनहून अधिक कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे.

येत्या १५ दिवसांत टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर या सेक्टरवर व्हीजीएफ अर्थात ‘व्यवहार्यता अंतर निधी’साठी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवून त्याला मान्यता मिळाल्यावर सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होईल.

‘बाउझर’द्वारे इंधनाचा पुरवठा

सोलापूर विमानतळावरचा इंधन प्रश्न देखील मार्गी लागला आहे. सोलापूर विमानतळावर दोन ‘बाउझर’ उपलब्ध झाले आहे. या द्वारे विमानाला ‘एटीएफ’ (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल )चा पुरवठा केला जाईल. यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमशी करार झाला असून, पुण्याहून आवश्यकतेनुसार हे ‘बाउझर’ सोलापुरात दाखल होतील.

सोलापूरहून पहिल्या टप्यात गोव्यासाठी विमानसेवा सुरु होत आहे. येत्या आठवड्यात विमान कंपनी तिकिटांचे आरक्षण प्रक्रियेविषयी तारीख जाहीर करणार आहे. एप्रिलच्या अखेरीस अथवा मेच्या पहिल्या आठवड्यात सोलापूरहून गोव्यासाठी विमानसेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

- अंजली शर्मा, सहायक महाव्यवस्थापक, सोलापूर विमानतळ

सोलापूर- मुंबई विमानसेवेला विलंब होत असेल तर सोलापूरहून पुण्याला विमानसेवा सुरू करण्यात यावी. पुण्याहून सोलापूरकर देशातील ३४ शहरांत विमानाने जाऊ शकतील. ही चांगली कनेक्टिव्हिटी ठरेल.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ, पुणे