pune-kolhapur highway Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

जागाच नाही... झाडे लावायची कुठं?; वळसे-कागल महामार्गाची स्थिती

सहापदरीकरणात तोडली तब्बल नऊ हजार झाडे

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : वळसे ते कागल या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास नेण्याची टेंडरमधील मुदत होती, त्याला ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. सहापदरीकरणाच्या कामावेळी महामार्गाच्या दोन्ही कडेने असलेली तब्बल नऊ हजार मोठी झाडे तोडण्यात आली होती. त्या जागी दुसरी झाडे लावण्याकडे आता सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. या कामात जागाच शिल्लक राहिलेली नाही, मग झाडं कुठं लावायची? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

समृद्धी महामार्ग तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या कडेने ही तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावली जाणार आहेत; पण सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा पुणे-बंगळूर महामार्गाच्या कडेची रुंदीकरणात तोडलेली झाडे कधी लावली जाणार? असा प्रश्न सर्वसामान्यांसह पर्यावरणप्रेमींतून उपस्थित होत आहे. वळसे ते कागल या महामार्गाचे काम सुरू आहे. सेवा रस्ते, स्वतंत्र तीन लेन, सेवा रस्त्याच्या कडेने वॉकिंग ट्रॅक अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. काही मोठ्या पुलांची कामे अपूर्ण असून, उर्वरित महामार्गाची व सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करण्यावर ठेकेदारांनी भर दिला आहे.

वळसे ते कागल या मार्गाच्या सहापदरीकरणात रस्त्याच्या दोन्ही कडेने असलेली व रुंदीकरणात मध्ये येणारी तब्बल नऊ हजार झाडे तोडली गेली. त्या जागी संबंधित ठेकेदाराने नवीन झाडे लावणे अपेक्षित होते. तशी टेंडरमध्ये नोंदही आहे; पण आता महामार्गाच्या कडेला जागाच शिल्लक राहिलेली नाही, त्यामुळे तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावली जाणार का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सध्या झाडाविना महामार्ग भकास झाला आहे. उन्हाच्यावेळी वाहने सेवा रस्त्याला पार्क केली जातात; पण सेवा रस्त्याच्या कडेनेही झाडे नाही. याचा छोट्या वाहनधारकांना त्रास होत आहे. एखादा अपघात झाला तरी अपघातग्रस्तांना रस्त्याच्याकडेला रुग्णवाहिका येईपर्यंत उन्हातच थांबवावे लागते.

जनरेटा उभारणे आवश्‍यक

झाडे ही साउंड बॅरिअर आणि प्रदूषण नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. असे असले तरी चौपदरीकरणावेळी लावलेली झाडेही सहपदरीकरणात काढून टाकण्यात आल्याने महामार्ग प्रशस्त असला तरी भकास दिसत आहे. त्यामुळे टेंडरमध्ये नोंद असल्याप्रमाणे महामार्गाच्या कडेने झाडे लावणे अपेक्षित आहे. त्यासाठी जनरेटा उभारणे आवश्यक आहे.

कारवाई कोण करणार?

सध्या अधिकारी व ठेकेदारांनी जागाच शिल्लक नसल्याने झाडे लावायची कुठे? असा पवित्रा घेतला आहे. या सोयीस्कर भूमिकेतून तोडलेली झाडे लावण्याकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार आहे; पण नियमानुसार संबंधित ठेकेदाराने महामार्गाचे कडेने जागा नसेल, तर शासकीय जागेत कुठेही नऊ हजार झाडे लावणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई ही होऊ शकते; पण हे काम अदानी ग्रुपकडे असल्याने त्यांच्यावर कोण कारवाई करणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दृष्टिक्षेपात...

-झाडाविना महामार्ग झाला भकास

-छोट्या वाहनधारकांना त्रास

-सावली नसल्याने उन्हातच थांबावे लागते