Satara Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्याच्या हद्दवाढीसाठी ४८ कोटींचा आराखडा; 'या' गावांत आता...

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : हद्दवाढीनंतर येथील पालिकेत समावि‍ष्‍ट झालेल्या शाहूपुरी, विलासपूरसह अन्य उपनगरांतील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी ४८ कोटींचा आराखडा तयार करण्‍यात आला आहे. त्यात हद्दवाढ भागातील ४१ किलोमीटरचे रस्ते, १३ किलोमीटर अंतराची गटारे बांधण्‍यात येणार आहेत.

गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारी पालिकेची हद्दवाढ मंजूर झाली. त्यानंतर शाहूपुरी, विलासपूर या ग्रामपंचायतींसह दरे खुर्द, शाहूनगरसह इतर उपनगरे पालिकेत समाविष्‍ट झाली. हद्दवाढीपूर्वी शाहूपुरी, विलासपूर येथील नागरिकांना आवश्‍‍यक सुविधा त्‍या ठिकाणच्‍या ग्रामपंचायत तर उपनगरे व त्रिशंकू भागांना जिल्‍हा परिषद, पंचायत समितीच्‍या माध्‍यमातून सुविधा पुरविण्‍यात येत होत्या. हद्दवाढीनंतर हा भाग पालिकेत समाविष्ट झाल्‍यानंतर त्‍या ठिकाणच्‍या नागरिकांना आवश्‍‍यक असणाऱ्या सोयी, पायाभूत सुविधा पुरविण्‍याची जबाबदारी पालिकेवर आली. या भागातील नागरिकांना आवश्‍‍यक असणाऱ्या सुविधांचा आराखडा पालिकेच्‍या वतीने तयार करण्‍यात आला.

आराखडा तयार होत असतानाच त्‍या त्‍या भागातील नागरिकांकडून आवश्‍‍यक कामांसाठीची मते मागविण्‍यात आली. हद्दवाढीतील नागरिकांनी प्रामुख्‍याने रस्‍ते, आरोग्‍य, पाणी, गटार, दिवाबत्ती आदी कामे सुचवली. त्यानुसार त्‍या कामांचा आराखडा पालिकेच्‍या वतीने तयार करण्‍यात आला. या आराखड्यात हद्दवाढ भागातील ४१ किलोमीटरचे नवे रस्‍ते तसेच १३ किलोमीटर लांबीची गटारांची कामे पहिल्‍या टप्‍प्‍यात करण्‍यात येणार आहेत. यासाठी ४८ कोटींचा आराखडा तयार करण्‍यात आला आहे.

पावसाचा अंदाज घेत कामे
सातारा पालिकेच्‍या वतीने आवश्‍‍यक कामांसाठीची टेंडर प्रक्रियाही सुरू केली आहे. येत्‍या काही दिवसांत या कामांना प्रत्‍यक्षात सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात रस्‍त्‍याचे डांबरीकरण करणे शक्‍य होणार नसल्‍याने आवश्‍‍यकतेनुसार नवीन रस्‍त्‍यांचे खडी आणि मुरुमीकरण करण्‍यात येणार आहे. यानंतर पावसाचा अंदाज घेत डांबरीकरण व इतर कामे करण्‍यावर पालिकेचा भर राहील. आगामी काळात पालिकेची निवडणूक होत असून हद्दवाढ भागातील मतदारांना आपल्‍याकडे खेचत सत्ता ताब्‍यात ठेवण्‍यासाठीची रणनीती या कामांच्‍या माध्‍यमातून सातारा विकास आघाडीने रचल्‍याचे दिसून येत आहे.