पुणे (Pune – Nagar Railway): पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला. हा मार्ग पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या बाजूनेच असेल. नवा मार्ग झाल्यास आताच्या तुलनेत ३८ किलोमीटर अंतर वाचेल.
नव्या मार्गासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. सध्याच्या रेल्वे मार्गाचे अंतर सुमारे १५४ किलोमीटर आहे. नवीन रेल्वे मार्गाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. त्यादृष्टीने मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून काही दिवसांपूर्वी ‘डीपीआर’ सादर केला.
यात हा मार्ग होणे प्रवासी आणि रेल्वेच्याही दृष्टिकोनातून फायदेशीर असल्याचे नमूद केले आहे. प्रस्तावित मार्गावर दुहेरीकरण व विद्युतीकरणही असेल.
पुण्याहून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येचा विचार करता पुढील किमान २० वर्षांचा विचार नव्या मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला आहे.
९ बोगदे अन् ११ स्थानके
११६ किमी ः लांबी
११ ः स्थानके
९ किमी ः बोगदे
११ हजार कोटी ः प्रस्तावित खर्च
असा असेल मार्ग?
पुणे-वाघोली-शिक्रापूर-रांजणगाव-शिरूर-कारेगाव-सुपा-चास-केडगाव
नव्या मार्गाचे फायदे
- पुणे-अहिल्यानगर रस्त्याने जाण्यास किमान तीन तास लागतात, मात्र वाहतूक कोंडीमुळे वेळ आणखी वाढतो
- नवीन रेल्वे मार्गामुळे दीड ते पावणेदोन तासांतच पुण्याहून अहिल्यानगरला जाता येईल
- शेतमालाच्या दृष्टीनेही रेल्वे मार्ग फायदेशीर ठरणार
- रांजणगाव, सुपा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) केंद्रे असल्याने औद्योगिक विकासाला चालना