पाथर्डी (Pathardi) : शेवगाव-पाथर्डीसह विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या यशश्री सप्लायर्स या एजन्सीचा परवाना खोटा असून, या योजनेची देखभाल दुरुस्ती करण्याची जी मुदतवाढ एजन्सीला दिली आहे ती बेकायदेशीर आहे. यात शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी केली आहे.
या संदर्भात खेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, शेवगाव-पाथर्डी व इतर गावांना पाणीपुरवठा करणारी योजना अनेक वर्षांपासून चालू आहे. मात्र, योजनेतील गावांना आठ दिवसातून एकदा पाणी मिळते. ज्या वेळेस या एजन्सीने पाणीपुरवठा करण्याचा ठेका घेतला त्या वेळी राबवण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेच्या वेळी या एजन्सीने खोटे व बनावट कागदपत्रे सादर केली आहेत.
या एजन्सीला कोणत्याही कामाचा पूर्वीचा कोणताही अनुभव नाही. जी कामे केल्याची कागदपत्रे जोडलेली आहेत, त्याची अंदाज पत्रकासह प्रशासकीय मान्यता व मूल्यांकनाची तपासणी केल्यास या प्रकारात शासनाची कशा पद्धतीने दिशाभूल व फसवणूक केली आहे ते लक्षात येईल.
या योजनेची जी दुरुस्ती संबंधित एजन्सीने केली आहे. त्या वेळी योजनेचे मटेरियल नेमके कुठे या एजन्सीने जमा केले आहे याची तपासणी व्हावी. योजनेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी व पाईपलाईनची जी दुरुस्ती करण्यात आली आहे, त्याचे मटेरियल नेमके कुठे जमा केले याची तपासणी करावी.
या योजनेच्या कामाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमावी. या समितीच्या चौकशीच्या वेळी मला बोलावण्यात यावे. या प्रकरणात ठेकेदार व काही अधिकाऱ्यांनी स्वतःची घरे भरण्याचा उद्योग केला असून या मध्ये शासनाचे मात्र कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी अन्यथा आपण उच्च न्यायालयात दाद मागू असे तक्रारीच्या शेवटी खेडकर यांनी म्हटले आहे.