सोलापूर (Solapur) : सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग २०१० ते २०१४ या काळात पूर्ण झाला. त्यावेळी या महामार्गावरून दररोज ३० हजार वाहनांची (पॅसेंजर कार युनिट) वर्दळ होती. डिसेंबर २०२४ अखेर या महामार्गावरील वाहनांची दररोजची संख्या ४२ हजारांवर पोचली आहे. वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघातही वाढल्याचे चित्र आहे. महामार्गाची लेन वाढीच्या निकषांनुसार ६० हजार वाहने दररोज ये-जा करत असल्यास सोलापूर-पुणे महामार्ग सहापदरी होणार आहे. आणखी दोन-तीन वर्षानंतर हा महामार्ग सहापदरी होईल, असेही ‘एनएचआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात रस्ते अपघातात दररोज सरासरी दोन जणांचा मृत्यू होतोय. रस्ते अपघाताबरोबरच अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढतच आहे. त्यामुळे सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणी विशेषतः ज्या गावकऱ्यांना शेती किंवा घराकडे ये-जा करण्यासाठी स्थानिकांना विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो, अशा ठिकाणी नव्याने उड्डाणपूल उभारले जात आहेत. मोहोळ शहरातील इंदिरा कन्या प्रशालेजवळ सतत अपघात होत होते. त्याठिकाणी आता उड्डाणपूल उभारला आहे. अशाप्रकारे आता अर्जुनसोंडजवळ काम सुरू झाले असून पुढे हा उड्डाणपूल लांबोटी (चंदननगर) पुलापर्यंत असणार आहे. त्यासाठी साधारणतः १९ कोटी रुपयांचा खर्च केला जात असून एक वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दुसरीकडे अनगर पाटीजवळील उड्डाणपुलासाठी ४५ कोटींचा खर्च अपेक्षित असून त्याचेही काम डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण होणार आहे. सावळेश्वरजवळील उड्डाणपुलासाठी ३० कोटींचा खर्च अपेक्षित असून मंजुरीसाठी त्याचा प्रस्ताव प्राधिकरणाला पाठविण्यात आला आहे. अंतिम मंजुरीनंतर याही पुलाचे काम सुरू होईल. सोलापूर-पुणे महामार्ग सहापदरी करताना फार भूसंपादनाची गरज भासणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर-पुणे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व गावकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी अनगर व अर्जुनसोंड या दोन ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारले जात आहेत. एका वर्षात दोन्ही ठिकाणचे काम पूर्ण होईल. दोन्ही ठिकाणी सर्व्हिस रोड व गटारी असतील. सोलापूर-पुणे महामार्ग सहापदरी व्हायला आणखी काही वर्षे वेळ लागेल. पण, वाहनांची गर्दी वाढत असल्याने भविष्यात हा महामार्ग सहापदरी करावा लागेल.
- राकेश जावडे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सोलापूर