मलकापूर (Malkapur) : कऱ्हाड ते मलकापूरची वाहतूक कोंडीची समस्येसह अपघाती क्षेत्राचा प्रश्न कायमचा निकाली लागण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचा आराखडा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालकांनी तयार केला आहे. महामार्ग विभागाने त्याची लेखी माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन काशीद यांना दिली. त्याबाबत कऱ्हाड व मलकापुरात नव्याने भूसंपादन होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
पुणे- बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे टेंडर मंजूर झाली आहे. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात कामासही सुरुवात होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून ड्रोन सर्व्हे झाला आहे. पर्यावरणीय परवानगी घेण्याची काम सुरू आहे. प्रकल्प संचालक परियोजना कार्यालयाने काशीद यांना पत्राद्वारे कळवले आहे. त्यात विकासकामाचा आराखडाही पाठवला आहे. कोल्हापूर नाका येथे वाहतूक कोंडी समस्या मोठ्या प्रमाणात होऊन अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. तेथे नागरिकांना अपघाती जीव गमवावा लागला आहे. तेथे सहापदरी उड्डाणपूल होणार आहे. त्यासाठी काशीद यांचे २०१४ पासून सातत्याने प्रयत्न केले आहेत.
कऱ्हाड ते मलकापूर जंक्शन येथे सिंगल कॉलमवर आधारित पावणेचार किलोमीटरचा पूल होणार आहे. तो कोल्हापूर बाजूकडील ग्रीन लँड हॉटेलपर्यंत ग्रेड सेप्रेटर असणार आहे. सहापदरीकरण प्रकल्पात लँडस्कॅपिंग, वृक्ष लागवड व संवर्धन, ॲटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, व्हिडिओ ट्रॅफिक मॅनेजमेंट, मोबाईल कम्युनिकेशन, ॲटोमॅटिक ट्रॅफिक काऊंटर आदी तांत्रिक इलेक्ट्रॉनिक सुविधांसह सुसज्ज रुग्णवाहिका, मेडिकल सुविधा, पेट्रोलिंग सुविधा, क्रेन सेवाही देण्यात येणार आहे.
कुठे काय होणार
- कोल्हापूर नाक्यावर पावणेचार किलोमीटरचा सहापदरी उड्डाणपूल ग्रेडसेपरेटर प्लायओव्हर - कोयना नदीवर १७ मीटरचा अतिरिक्त तीन लेनचा पूल
- कोयना नदीवर ११ मीटरचा नवीन सेवा रस्ता
- नारायणवाडी येथे ट्रक थांबा
- नांदलापूर, वारुंजी येथे बस थांबा