Kolhapur Municipal Corporation

 

Tendernama

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरातील पुतळ्यांची होणार रंगरंगोटी; सुशोभिकरणाला गती

टेंडरनामा ब्युरो

कोल्हापूर (Kolhapur) : शहरातील पुतळ्यांची रंगरंगोटी आणि भोवतीच्या परिसराचे सुशोभिकरण लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले असून, त्या अंतर्गत ही सर्व कामे होणार आहेत. त्याच बरोबर सिग्नलच्या ठिकाणी पट्टे मारणे, रस्त्याच्या बाजूपट्ट्या रंगवणे ही कामे देखील केली जाणार आहेत.

शहरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये मान्यवर व्यक्तींचे पुतळे आहेत. ऊन, पाऊस आणि धूळ यामुळे या पुतळ्यांचे रंग निघून जातात. तर काही पुतळ्यांचे सिंमेंट पडते. त्यामुळे पुतळयांचे सौंदर्य टिकून रहात नाही. यासाठी वर्षातून एकदा पुतळ्यांची डागडुजी आणि रंगरंगोटी करावी लागते. महापालिकेने नुकतेच या बाबतचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

या अंतर्गत पुतळ्यांची दुरुस्ती, रंगवणे तसेच पुतळ्या भोवती कुंपणाच्या आतील भागाचे सुशोभीकरण ही कामे केली जाणार आहेत. शहरातील काही चौकांमध्ये सिग्नल जवळील झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या आणि रस्त्याच्या बाजूपट्टयाही रंगवायच्या आहेत. याबाबतची टेंडरमध्ये उल्लेख आहे. टेंडर आणि बयाणा रक्कम भरण्याचा कालावधी मंगळवार (ता. १५) ते २ मार्च दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. टेंडर अर्ज व अन्य माहिती https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ४ मार्चला दुपारी ३ वाजता टेंडर उघडणार आहे. यामुळे शहरातील पुतळ्यांना पुन्हा एकदा नवे स्वरुप मिळणार आहे.