Ajinkyatara Fort
Ajinkyatara Fort Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यासाठी मोठा निधी

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : किल्ले अजिंक्यताऱ्यावर जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. त्यामुळे पर्यटक आणि सातारकरांची मोठी गैरसोय होत होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasingh Bhosale) यांच्या पाठपुराव्यामुळे अजिंक्यताराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी शासनाच्‍या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून तब्बल ५ कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे.

अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे पर्यटक आणि खास करून सकाळी व सायंकाळी किल्ल्यावर फिरण्‍यासाठी जाणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. सर्वांचा त्रास दूर करण्यासाठी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरू होता.

या पाठपुराव्याला यश मिळाले असून, पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून अजिंक्यतारा किल्ल्याच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्याने किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. तातडीने टेंडर प्रक्रिया व इतर सोपस्कार पूर्ण करून काम त्वरित सुरू करा. काम दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजेंनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.