पुणे (Pune) : अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर सोलापूर विमानतळावरून विमानसेवेचे उड्डाण होत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोलापूर-मुंबई व सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू होत आहे.
लवकरच फ्लाय ९१ कडून विमानांच्या तिकिटाचे बुकिंगदेखील सुरू होत आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लक्ष घातल्याने ‘डीजीसीए’कडून ‘एटीआर- ७२’ विमानालाही मंजुरी मिळत आहे.
‘फ्लाय ९१’ कंपनीतर्फे सोलापूरहून विमानसेवा सुरू केली जात आहे. कंपनीने पूर्वी २३ डिसेंबरला सेवा सुरू करणार, असे जाहीर केले होते. मात्र, कंपनीकडून योग्य नियोजन न झाल्याने त्याचा फटका सोलापूरकरांना बसला.
कंपनीने आधी सोलापूरसाठी ४० आसनी विमानातून सेवा देण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) दिला. नंतर पुन्हा ‘एटीआर-७२’ या ७२ विमानांचा प्रस्ताव दिला. त्याला मंजुरी मिळण्यात उशीर झाला. ‘डीजीसीए’ने जरी परवानगी दिली नसली, तरीही सोलापूरच्या विमानसेवेबाबत मोहोळ आग्रही असल्याने येत्या काही दिवसांतच ‘डीजीसीए’कडून परवानगी मिळेल, असे स्पष्ट संकेत ‘डीजीसीए’च्या विश्वसनीय सूत्रांनी दिले.
‘बॉवसर’द्वारे इंधनाचा पुरवठा
विमान कंपनीने सोलापूर विमानतळावर इंधनाची टाकी बांधण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार विमानतळ प्रशासनानेदेखील इंधनाची टाकी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तत्पूर्वी विमानसेवा सुरू व्हावी, याकरिता पुण्याहून विमानाला लागणारे इंधन ‘एटीएफ’ (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल) हे पुण्याहून करण्याचा निर्णय झाला आहे.
‘हिंदुस्थान पेट्रोलियम’शी करार झाल्याने इंधन ‘बॉवसर’द्वारे पुण्याहून सोलापूरला आणले जाणार आहे. इंधनाची टाकी केवळ दोन दिवसांत बांधून पूर्ण होईल, त्यासाठी विमानतळ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
शिर्डी, पुण्यासाठीही विमानसेवा
- ‘फ्लाय-९१’ कंपनीने आपल्या ताफ्यात आणखी दोन नवीन विमान घेतले आहे
- ‘एटीआर-७२’ प्रकारचे हे विमान असून, त्याची नोंदणीची प्रक्रिया ‘डीजीसीए’कडे सुरू आहे
- नोंदणी झाल्यावर दोन विमानांच्या माध्यमातून सोलापूर-पुणे व सोलापूर-शिर्डी अशी विमानसेवा सुरू होऊ शकते
सोलापूरची विमानसेवा सुरू होण्याच्या मार्गातील अडथळे दूर केले आहेत. ‘डीजीसीए’कडूनही लवकरच मंजुरी दिली जाईल. ‘बॉवसर’द्वारे विमानाला इंधन उपलब्ध केले जाईल. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोलापूरची विमानसेवा सुरू होईल.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री