बार्शी (Barshi) : टेंभुर्णी ते लातूर चौपदरी रस्त्याचे काम सध्या सुरू असून, बार्शी शहरातून जाणारा बार्शी-कुर्डुवाडी रस्ता बार्शी नगरपालिकेच्या ताब्यात आहे त्याचे नगरोत्थान योजनेतून रुंदीकरणाचे काम चालू आहे. ठेकेदाराने मागील दोन महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवला आहे पण कामाला गती नसून आसपास राहणाऱ्या रहिवासी व वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना हा रस्ता अपघाताचे आमंत्रण देत आहे अशी परिस्थिती आहे.
जैन मंदिर ते हायवे बस स्थानकापर्यंत रस्ता शंभर फूट करण्यासाठी अर्धा रस्ता खोदण्यात आला असून, अशा मुख्य रस्त्यावर अनेक रहिवासी कॉलनी, हॉटेल, विविध व्यावसायिकांची दुकाने आहेत, त्यांच्याकडे ग्राहकांनी जायचे म्हटले तर कसरत करावी लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बार्शी शहर मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते जड वाहने, एसटी बस, खासगी वाहनांची मोठी वाहतूक असताना, रस्त्याची खोदाई केल्यामुळे चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता खोदला आहे असे दर्शविणारा फलक किंवा वाहनांचा अपघात होऊ नये, यासाठी कोणतीही दक्षता घेण्यात आलेली नाही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
रात्रीच्या वेळी चारचाकी मोठ्या वाहनांच्या प्रकाश झोतामुळे दुचाकीस्वारांना वाहन बाजूला घेताना किरकोळ अपघात झाले आहेत तर एखादे वाहन खांदून ठेवलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात गेल्यास नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. कामावर देखरेख करण्यासाठी नगरपालिकेचे इंजिनिअर अथवा इतर कोणतेही सक्षम अधिकारी आजपर्यंत दिसलेला नाही. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता दिसून येत नाही, रस्त्याचे काम ताबडतोब सुरू करावे, अशी मागणी दररोज प्रवास करणाऱ्या तसेच त्या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी केली असून नागरिकांची, प्रवाशांची गैरसोय दूर करावी यासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे पण रस्त्याच्या प्रगतीकडे वाटचाल दिसून येत नाही.
बार्शी-कुर्डुवाडी रस्त्याचे काम रखडले असून, त्या भागातील रहिवासी, व्यापारी यांनी रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला आत्तापर्यंत तीन नोटीस दिल्या आहेत. ठेकेदाराने काम गतीने सुरू केले नाही तर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल.
- बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी तथा प्रशासक, नगरपरिषद, बार्शी
तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस काम बंद ठेवण्यात आले होते. मागील चार दिवसांपासून काम सुरू केले आहे. एका आठवड्यात रस्त्याच्या लेवलपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल. दोन तीन महिन्यात काँक्रिटचा रस्ता पूर्ण होणार आहे. नागरिकांना, व्यापाऱ्यांना यापुढे त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
- स्वयंम जैन, अजमेरा कन्स्ट्रक्शन, धाराशिव