Metro
Metro Tendernama
मुंबई

नवी मुंबई मेट्रोच्या ३ नव्या मार्गिकांच्या डीपीआरचे काम सुरु

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर असताना सिडकोने खांदेश्वर, तळोजा एमआयडीसी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या तीन मार्गांवरच्या मेट्रोचे काम हाती घेतले आहे. प्रकल्पाचा आराखडा व रचना तयार करण्याचे काम केंद्र सरकारच्या यूएमटीसी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. लवकरच मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे.

नवी मुंबईत होत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला अधिक गतिमान दळणवळणाची साधने उपलब्ध करण्यासाठी सिडकोने मेट्रोचे काम सुरू केले. सर्वांत पहिल्यांदा बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटरच्या मार्गावर नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याचे काम हाती घेतले. मात्र सिडकोच्या पहिल्या मेट्रोची रखडपट्टी झाली. इतर तीन मेट्रोमार्गांचे काम रखडू नये म्हणून सिडकोने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो लाईन २ मध्ये तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर या सात किलोमीटर अंतरावर मेट्रोची सहा स्थानके असणार आहेत. पेंधर ते तळोजा एमआयडीसी या सुमारे तीन किलोमीटर अंतराचा तिसरा टप्पा असणार आहे. या मार्गावर ३ मेट्रो स्थानके सिडकोने निश्चित केली आहेत. खांदेश्वरहून थेट विमानतळावर जाण्यासाठी चार किलोमीटर अंतर मार्गाचे ४ थ्या टप्प्यात काम केले जाणार आहे.

विमानतळ तयार होण्याआधीच हे मेट्रो मार्ग पूर्णपणे कार्यान्वित करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने सिडकोने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. या टप्प्यांची आराखडा, रचना तयार करण्याचे काम सिडकोतर्फे सुरू झाले आहे. या मार्गावरील व्यवहार्यता आणि आराखडा तयार करण्यासाठी यूएमटीसी या केंद्र सरकारच्या कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीने त्यांचा अहवाल सिडकोकडे सुपूर्द केल्यानंतर प्रत्यक्ष विकासकामींची टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या बेलापूर ते पेंधर या ११ किमीच्या मार्गावरील सिडकोच्या पहिल्या मेट्रोला अद्याप मुहूर्त सापडत नाही. या मार्गावरील तळोजा ते सेंट्रल पार्क या सहा किलोमीटर अंतरावरील मार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे. सर्व सहा मेट्रो स्टेशन बनून तयार आहेत; मात्र राज्य सरकारतर्फे उद्‍घाटन सतत पुढे ढकलण्यात येत आहे. आतापर्यंत या मार्गावर मेट्रोच्या सराव चाचण्यासुद्धा झाल्या आहेत.