मुंबई (Mumbai): मुंबईत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. अशा स्थितीत पनवेल-बोरिवली-वसई हा कॉरिडॉर लोकल प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
पनवेल-बोरिवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडॉर या बहुचर्चित प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. पनवेल-बोरिवली-वसई उपनगरीय लोकल रेल्वे 69.23 किलोमीटर अंतर धावणार आहे. या प्रकल्पासाठी 12,710 कोटी खर्च होणार असून राज्य सरकार आणि रेल्वे खात्याच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
या प्रकल्पामुळे मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
नवी मुंबई, रायगड, ठाणे, वसई-विरार आणि मुंबईतील लाखो प्रवाशांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. सध्या पनवेलहून वसई किंवा बोरिवलीला जाण्यासाठी प्रवाशांना हार्बर, सेंट्रल किंवा वेस्टर्न मार्गाने बदल करून जावे लागते.
नव्या कॉरिडॉरमुळे हा त्रास वाचणार आहे. तसेच लोकल मार्गांवर गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना प्रवासात अधिक सोयीस्कर पर्याय मिळेल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये...
हा प्रकल्प मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या अंतर्गत उभारण्यात येणार आहे.
पनवेल ते बोरिवली आणि वसई अशी रेल्वे कॉरिडॉरची रचना करण्यात येणार आहे.
विद्यमान पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईनला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असणार आहे.
नव्या कॉरिडॉरमुळे पनवेलहून वसई किंवा बोरिवलीला थेट लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार.