bus
bus Tendernama
मुंबई

वसई-विरार महापालिकेचे 57 ई-बससाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत ५७ इलेक्ट्रिक बससाठी वसई-विरार महापालिकेने नव्याने टेंडर काढले आहे. टेंडर प्रक्रियेनंतर पहिल्या टप्प्यात ३२ बस महापालिकेच्या ताफ्यात दाखल होतील. ९ आणि १२ मीटरच्या या बस वातानुकूलित व विनावातानुकूलित प्रकारातील असणार आहेत.

वसई-विरार महापालिका परिवहन सेवेत नवीन २० सीएनसी व दोन हायब्रिड इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याबाबत १६ मार्च २०२१ रोजीच्या ठरावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यानुसार २० जुलै ते १३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ई-टेंडर मागवण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत हवा गुणवत्तेसाठी बंधनकारक निर्देशानुसार, सीएनजी बस खरेदी न करता इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार टेंडर रद्द न करता आठ सीएनजी बसऐवजी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी नवीन टेंडर मागवण्यात याव्यात, अशा सूचना केल्या होत्या

इलेक्ट्रिक-हायब्रिड वाहन खरेदी करण्यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत एकूण निधीपैकी २० कोटी ८६ लाख निधी प्राप्त झाला होता. माजी सभापती आणि आयुक्तांनी शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने विनावातानुकूलित बस घेण्याबाबत निर्णय झाला. त्यानुसार २ नोव्हेंबर २०२१ रोजी याकरिता टेंडर मागवण्यात आले होते; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे या टेंडरलाही स्थगिती देण्यात आली होती. राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक बस धोरणानुसार वसई-विरार महापालिकेने १५ इलेक्ट्रिक बसकरिता दुसरी टेंडर प्रक्रिया राबवली होती; मात्र सोबतच महापालिका या बस बूम तत्त्वावर घेण्यास आग्रही असल्याने केंद्र सरकारकडे याकरिता पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर महापालिकेच्या विनंतीला मान देत महापालिकेच्या बूम तत्त्वावरील बसखरेदीस मंजुरी दिल्याने तिसऱ्यांदा ही टेंडर प्रक्रिया महापालिकेमार्फत राबवण्यात आली आहे.