मुंबई (Mumbai): देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघरमधील वाढवण बंदरासाठी दळणवळणाची सुविधा आता अधिक वेगवान होणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वरोर-वाढवण-तवा दरम्यानच्या ३२.१८० किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेतले असून, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे मार्च अखेर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून एप्रिल २०२६ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियोजन आहे. तसेच काम सुरू झाल्यापासून अडीच वर्षांत महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
वाढवण बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या थेट रस्ता उपलब्ध नाही. बंदराच्या बांधकामासाठी लागणारी अवजड यंत्रसामग्री आणि साहित्य नेण्यासाठी या महामार्गाची भूमिका कळीची ठरणार आहे. विशेष म्हणजे, याच प्रकल्पात एका सेवा रस्त्याचा समावेश असून, त्याचा वापर सुरुवातीला बंदर बांधकामाच्या साहित्यासाठी केला जाईल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धोरणानुसार, ९० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय निविदा अंतिम केली जात नाही. डहाणू आणि पालघर तालुक्यातील ६०५ हेक्टर जागेपैकी ९० टक्के संपादन पूर्ण झाले असून सध्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या या कामाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी दिली.
हा प्रकल्प केवळ स्थानिक उपयोगासाठी मर्यादित न राहता, राज्याच्या इतर जिल्ह्यांनाही जोडला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तवा ते भरवीर दरम्यान द्रुतगती मार्ग बांधणार आहे, जो थेट 'समृद्धी महामार्गाला' जोडला जाईल. यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास सुलभ होईल.
वाढवण बंदराच्या विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने कंबर कसली असून, एप्रिलपासून या महामार्गाचे काम सुरू होत आहे. यामुळे पालघर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.