Vande Bharat Train
Vande Bharat Train Tendernama
मुंबई

मुंबई-अहमदाबाद मार्गावर मिनी बुलेट ट्रेनचा थरार; वाचा सविस्तर...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई ते अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) मार्गावर मिनी बुलेट ट्रेनचा (Mini Bullet Train) थरार लवकरच प्रवाशांना अनुभवता येणार आहे. या मार्गावरील बुलेट ट्रेन प्रकल्प देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. या बुलेट ट्रेनमुळे (Bullet Train) भारतीय रेल्वेच्या इतिहासात नवे वेगवान पर्व सुरू होणार आहे. मात्र, या बुलेट ट्रेन सुरू होण्यास आणखी काही वर्षे लागणार आहेत. सध्या मुंबई - अहमदाबाद मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे गाडी धावणार आहे. (Mumbai - Ahmedabad Semi Highspeed Vande Bharat Express)

मुंबईतून ते अहमदाबाद या मार्गावर देशातील तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. त्यासाठीच्या तयारीला वेग आला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर विनाइंजिन सेमी हायस्पीड 'वंदे भारत' रेल्वेगाडीची दर ताशी 130 कि.मी.च्या वेगाने चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी राजस्थानमधील कोटा येथून निघालेली सेमी हायस्पीड 'वंदे भारत' एक्सप्रेस काल मुंबई सेंट्रल स्थानकावर दाखल झाली आहे. सध्या या मार्गावर रेल्वेची पहिली खासगी रेल्वेगाडी तेजस आठवड्यातून ५ दिवस चालविण्यात येते. तिची जागा आता 'वंदे भारत' एक्सप्रेस घेणार आहे.

ही अत्याधुनिक रेल्वे गाडी बुलेट ट्रेनची मिनी आवृत्ती समजली जाते. लोकलप्रमाणे या गाडीलाही ड्रायव्हरचे केबिन असते. त्यामुळे वंदे भारत ट्रेनला पुढे इंजिन जोडण्याची आवश्यकता नसते. या गाडीला कोचमध्ये मोटर असून पेंटोग्राफवर ती मेट्रो प्रमाणे धावते. 2018 मध्ये पहिला ट्रेन सेट चेन्नईच्या आयसीएफने तयार केला होता. लखन‌ऊ ते वाराणसी अशी पहिली वंदे भारत 2019 मध्ये धावली होती. त्यानंतर वैष्णोदेवीला जाण्यासाठी दिल्ली ते काटरा दुसरी वंदे भारत सुरू झाली. आता मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर तिसरी वंदे भारत सुरू करण्यात येणार आहे.

सध्याच्या 'वंदे भारत' ट्रेन या चेअरकार स्वरूपाच्या आहेत. म्हणून त्या दिवसाच्या चालविण्यात येणार आहेत. जेव्हा स्लिपर कोचवाली वंदे भारत गाडी तयार करण्यात येईल त्यावेळी मुंबई ते दिल्ली मार्गावर वंदे भारत चालविण्यात येणार आहे. ताशी 160 कि.मी.च्या वेगाने धावण्याची क्षमता असलेली सेमी हायस्पीड 'वंदे भारत' ही ट्रेन देशभरातील 400 शहरांमध्ये चालविण्यात येणार आहे. ही ट्रेन सध्या वाराणसी ते दिल्ली, जम्मू ते काटरा या मार्गांवर चालविण्यात येत असून ही गाडी आंतरराष्ट्रीय मानकांनूसार तयार करण्यात आली आहे. या ट्रेनच्या मेन्टेनन्सकरीता जोगेश्वरी येथे सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.

ही ट्रेन लक्झरीयस असून तिच्या आत बसणाऱ्या प्रवाशांना जरासुद्धा धक्के बसत नाहीत असे तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले आहे. ट्रेनच्या डायनिंग टेबलवर पाण्याने भरलेला ग्लास ठेवून या ट्रेनच्या 'शॉक ऑब्जव्ह'ची ताशी 180 च्या वेगावर 'कॉईन टेस्ट' घेण्यात आली होती, त्याचा व्हीडिओ नुकताच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला होता.