Expressway Tendernama
मुंबई

तिसऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या टेंडरला ‘तारीख पे तारीख’; पागोटे-चौक टप्प्याला १५ वेळा मुदतवाढ

३० किमीच्या पहिल्या टप्प्यासाठी २०२४ मध्ये टेंडर; २०२५ मध्ये रद्द करून नव्याने प्रक्रिया, आता पुन्हा १ ऑक्टोबरची तारीख

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याच्या योजनेतील तिसऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या टेंडरला तब्बल १५ हून अधिक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. पागोटे ते चौक या ३० किमीच्या टप्प्यासाठी २०२४ मध्ये टेंडर काढण्यात आले होते. ते २०२५ मध्ये रद्द करून ऑगस्ट २०२५ मध्ये नव्याने टेंडर काढण्यात आले. त्यालाही सातत्याने मुदतवाढ देण्यात आली असून आता १ ऑक्टोबरला टेंडर खुले होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पासाठी ९० टक्के भूसंपादन पूर्ण होणे आणि पर्यावरणासंबंधीच्या आवश्यक परवानग्या मिळणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येत आहे. त्यासाठी अटल सेतू-चौक-शिवारे, पुणे असा सुमारे १३० किमीचा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित आहे. या मार्गाचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पागोटे ते चौक हा सुमारे ३० किमीचा पहिला टप्पा, तर चौक ते शिवारे, पुणे हा अंदाजे १०० किमीचा दुसरा टप्पा आहे.

महामुंबईचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यासह तिसरी आणि चौथी मुंबई वसवण्याच्या नियोजनामुळे भविष्यात मुंबई-पुणे मार्गावरील वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्याचे मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग भविष्यात अपुरे पडू शकतात, हे लक्षात घेऊन एनएचएआयने या तिसऱ्या द्रुतगती महामार्गासाठी पुढाकार घेतला आहे.

पागोटे ते चौक महामार्गाचा आराखडा अंतिम झाल्यानंतर २०२४ मध्ये बांधकामासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. या टेंडरला अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. अखेर २०२५ मध्ये ते रद्द करून ऑगस्ट २०२५ मध्ये नव्याने टेंडर काढण्यात आले. मात्र, नव्या टेंडरलाही आतापर्यंत १५ हून अधिक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

टेंडरला वारंवार मुदतवाढ का दिली जात आहे आणि बांधकामाला विलंब का होत आहे, याबाबत एनएचएआयचे प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांच्याशी विचारणा करण्यात आली. त्यांनी टेंडरला पुन्हा मुदतवाढ दिल्याचे सांगितले.

एनएचएआयच्या नियमांनुसार प्रकल्पाचे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याशिवाय आणि पर्यावरणासंबंधीच्या सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्याशिवाय काम सुरू करता येत नाही, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. या प्रकल्पाचे भूसंपादन आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अद्याप पूर्ण होणे बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एनएचएआयच्या संबंधित अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता १ ऑक्टोबरला टेंडर खुले होते की पुन्हा मुदतवाढ मिळते, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, टेंडर प्रक्रियेला वारंवार मुदतवाढ मिळत असल्याने तिसऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रत्यक्ष कामालाही विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Key Points

  • तिसऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या टेंडरला १५ हून अधिक वेळा मुदतवाढ,

  • पागोटे ते चौक हा ३० किमीचा पहिला टप्पा; चौक ते शिवारे सुमारे १०० किमीचा दुसरा टप्पा,

  • २०२४ मधील टेंडर २०२५ मध्ये रद्द; ऑगस्ट २०२५ मध्ये नव्याने टेंडर प्रक्रिया,

  • ९० टक्के भूसंपादन आणि पर्यावरण परवानग्या पूर्ण होणे आवश्यक,

  • आता १ ऑक्टोबरला टेंडर खुले होते की पुन्हा मुदतवाढ मिळते, याकडे लक्ष.