Nala Safai
Nala Safai Tendernama
मुंबई

Thane : गेल्यावर्षीची 8 कोटींची नालेसफाई वर्कऑर्डरशिवाय

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : गेल्यावर्षी पावसा‌ळ्यापूर्वी ८ कोटी रुपये खर्चून ठाणे शहरात नालेसफाईची कामे करण्यात आली असली तरी आयुक्तांच्या मंजुरीविनाच झालेल्या या कामांचे ठेकेदारांना कार्यादेश सुद्धा देण्यात आलेले नसल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर टेंडरमधील अटीनुसार नाल्यातून काढलेल्या गाळाचे मोजमाप, गाळाचे छायाचित्र, नालेसफाई करण्यापूर्वी आणि सफाईनंतरच्या छायाचित्रासह इतर माहिती महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचा दावा मनसेने केला आहे. या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनसेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाकरीता २०२२ – २०२३ या वर्षासाठी सुमारे ८ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. परंतु आजपर्यंत या कामांचे कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कार्यादेश नसतानाही ठेकेदारांनी नालेसफाईची कामे केलीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नालेसफाईचे काम हे विशेष स्वरूपाचे नाही. तरीही हे काम विशेष स्वरूपाचे असल्याचे दाखवत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेचीच फसवणूक केली आहे. संबंधित कामात १९ टक्क्यांचा ट्रेंड रेट असूनही हे काम ट्रेंड किंमतीनुसार करण्यात आलेले नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.

नालेसफाईच्या कामात टेंडरमधील अटीनुसार नाल्यातून काढलेल्या गाळाचे मोजमाप, गाळाचे छायाचित्र, नालेसफाईच्या काम सुरू करण्यापूर्वीचे आणि काम सुरू असतानाचे छायाचित्र आणि चित्रीकरण, गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची माहिती, नालेसफाई करणाऱ्या कामगारांची यादी, कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. यावरूनच या नालेसफाईच्या दिखाव्यामध्ये कोट्यवधींचा अपहार केला जात असल्याचे दिसून येतो, असा आरोपही त्यांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या विषयाचा पाठपुरावा करत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती वेळोवेळी देण्यास टाळाटाळ केली असून घनकचरा विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त आणि मुख्य आरोग्य अधिकारीच या महाघोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे कागदपत्रांच्या माध्यमातून उघड होत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

नव्या आयुक्तांनी पदभार स्विकारल्यानंतर या घनकचरा विभागातील घोटाळ्याची माहिती मिळताच काही महिन्यांपूर्वीच या विभागाच्या उपायुक्तांची बदली करण्यात आली होती. मात्र अजूनही घोटाळ्यांचे सत्र सुरूच आहे. तर शासनाच्या महा टेंडर या वेबसाईटवर एक वर्ष उलटून गेले तरीदेखील अजून पर्यंत या कामाचा कार्यादेश उपलब्धच नसल्याचे या वेबसाईटवर बघितल्यास दिसून येत आहे, अशा प्रकारे ठाणे महापालिकेचे अधिकारी शासनाचीही फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त यांनी आयआयटी सारख्या संस्थेच्या माध्यमातून नालेसफाईच्या कामाचे परीक्षण केले पाहिजे. तसेच नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक तसेच निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.