Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation Tendernama
मुंबई

Thane : महापालिकेने टेंडर प्रक्रियेतून माघार घेणाऱ्या ठेकेदाराची केली कोंडी

टेंडरनामा ब्युरो

ठाणे (Thane) : पावसाळ्यात पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती ओढवू नये, यासाठी पालिका प्रशासनाने नालेसफाईची टेंडर प्रक्रिया राबविली. या टेंडर प्रक्रियेत उथळसर, कळवा आणि वागळे इस्टेट या प्रभाग समिती क्षेत्रातील नालेसफाईची कामे करण्याची तयारी ठेकेदाराने दाखविली, मात्र दिवा प्रभाग समितीमधील टेंडरमधून माघार घेणे, ठेकेदाराला चांगलेच महागात पडले आहे. पालिकेने टेंडरमधील अटी व शर्तींचा आधार घेत ठेकेदाराला पुढील तीन वर्षे पालिकेच्या टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध केला आहे.

पावसाळ्यात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्याने नाले तुंबण्याच्या घटना घडतात. त्यामुळे दुर्घटनादेखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये, यासाठी पालिकेने वेळेत नालेसफाई व्हावी, यासाठी नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ठाणे पालिका प्रशासनाने यंदा २०२४-२५ या वर्षासाठी पालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समितीअंतर्गत मुख्य नाले आणि त्याला जोडणाऱ्या लहान-मोठ्या अशा ३८४.९१ किमी नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी नालेसफाईच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी महिनाभर आधीच टेंडर प्रक्रिया राबवली आहे. यावेळी कळवा, उथळसर आणि वागळे इस्टेट या तीन प्रभाग समितीची कामे करण्यात तयार आहे. दिवा प्रभाग समितीमधील नालेसफाईच्या कामाचे टेंडर माघार घेत असल्याचे कंपनी पालिकेला कळविले. यापूर्वीदेखील अशाचप्रकारे मे. जी. ॲण्ड जी कन्स्ट्रक्शन या कंपनीने २०२२ मध्ये माघार घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारत दिवा प्रभाग समितीमधील नालेसफाईच्या कामाचे टेंडरमधून माघार घेणाऱ्या मे. जी. ॲण्ड जी कन्स्ट्रक्शन या कंपनीला पालिकेने पत्र पाठवून पुढील तीन वर्षे पालिकेच्या टेंडरमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध केला आहे. टेंडर पत्रातील अट क्रमांक १३ नुसार टेंडरमधील दर उघडण्यात आल्यानंतर टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्यास टेंडरची इसारा रक्कम जप्त करून टेंडरकाराला पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी ठाणे महापालिकेच्या निविदेमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध असेल, अशी तरतूद आहे. यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिकेने ही कारवाई केली आहे.

दुसऱ्या कंपनीला ठेका
ठाणे पालिकेने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईचे टेंडर २०२२ मध्ये काढले होते. यात दिवा, कळवा, उथळसर आणि वागळे इस्टेट या चार प्रभाग समितीसाठी मे. जी. ॲण्ड जी कन्स्ट्रक्शन या कंपनीने लघुत्तम दराने टेंडर भरली होती. टेंडर अटी व शर्तीनुसार एकाच वेळी चारही प्रभाग समितीची नालेसफाईचे काम पूर्ण करणे बंधनकारक होते; परंतु कळवा, उथळसर आणि वागळे इस्टेट या तीन प्रभाग समितीची कामे करण्यात तयार असून दिवा प्रभाग समितीमधील नालेसफाईच्या कामाचे टेंडर माघार घेत असल्याचे कंपनी पालिकेला कळविले होते. यानंतर पालिकेने टेंडरमधील दुसऱ्या क्रमांच्या लघुत्तम टेंडर भरणाऱ्या मे. अभिषेक कन्स्ट्रक्शन यांना कामाचा ठेका देण्यात आला होता.