Multimodal Cargo Hub Tendernama
मुंबई

Thane: बापगांव येथे मल्टी मॉडेल हब उभारणार; 98 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): भाजीपाला निर्यातीकरिता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगांव (ता. भिंवडी ) येथे सर्वोपयोगी – मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला ७ हेक्टर ९६.८० आर जमीन उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली.

या जागेवर जागतिक बँक व महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) या प्रकल्पाच्या माध्यमातून हब, टर्मिनल उभारण्यात येणार आहे. ज्यासाठी ९८ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला आहे.

ही जमीन राज्य कृषी पणन महामंडळाला वर्ग – २ धारणाधिकारांने विनामूल्य दिली जाणार असून, या ठिकाणी व्हेपर हिट ट्रीटमेंट, प्लॅंट विकीरण, पॅक हाऊस सुविधा तसेच फळे- भाजीपाला साठवणुकीकरिता सुविधांची उभारणी केली जाणार आहे. याठिकाणी आंबा, मसाले, पशुखाद्य यांच्यावर विकीरण प्रक्रियेद्वारी निर्जलीकरण करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे दरवर्षी एक लाख टन शेतमालाची हाताळणी करणे शक्य होणार आहे. ठाणे जिल्ह्यासह, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी सुविधा निर्माण होणार आहे. यातून शेतमाल निर्यातीस प्रोत्साहन मिळणार आहे.

शेतमालाची गुणवत्ता सुधारणे, प्रक्रिया करणेची सुलभ होणार आहे. याठिकाणी व्यापारी व निर्यातदार यांना एकाच छताखाली आणले जाणार आहे. यातून निर्यात आणि लॉजिस्टिक (logistics) सेवांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. निर्यातवाढीमुळे परकीय चलन मिळणार आहे.

जगभरातील बाजारपेठा व प्रकल्पांचा अभ्यास करुन एकात्मिक असा प्रकल्प उभारणेत येणार असल्यामुळे शेतमालाचे काढणीपश्चात नुकसान कमी होण्यास व मालाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती होणार असून लगतच्या परिसरातील व्यवसायांना देखील चालना मिळणार आहे.