Thane
Thane Tendernama
मुंबई

Thane Metro : ठाणे मेट्रो कारशेडच्या किंमतीत तब्बल 200 कोटींची वाढ; काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मोघरपाडा येथील ठाणे मेट्रो कारशेडच्या (Thane Metro Carshed) किंमतीत तब्बल दोनशे कोटींच्या वाढीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (MMRDA) नुकतीच मान्यता दिली आहे. आता या कारशेडसाठी ९०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मेसर्स एस.ई.डब्लू आणि व्ही.एस.ई यांच्या एकत्रित कंपनीस हे २४ टक्के दरवाढीचे टेंडर (Tender) देण्यात आले आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या कामास गती मिळावी यासाठी काही दिवसांपूर्वी मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा येथील जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. जागा हस्तांतरण होण्यापूर्वी एमएमआरडीएने कारशेडच्या कामासाठी ७११ कोटी ३४ लाखाचे अंदाजपत्रक जाहीर केले. या अंदाजपत्रकाच्या आधारे टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली.

नुकतीच राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मूळ अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा १९५ कोटी रुपयांनी अधिक असलेल्या ९०५ कोटी रुपयांच्या टेंडरला मान्यता देण्यात आली आहे.

मोघरपाडा येथयेथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या उभारणीसाठी 'एमएमआरडीए'ने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने ७११ कोटी ३४ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. याच दरानुसार टेंडर मागवण्यात आले. मात्र हे अंदाजपत्रक चुकीचे आणि जुन्या दरानुसार असल्याचे सांगत कार्यकारी समितीने २४ टक्के वाढीव दराच्या टेंडरचे समर्थन केले आहे.

या प्रकल्प खर्चात १९५ कोटींनी वाढ होऊन तो ९०५ कोटींवर गेला आहे. अंदाजपत्रक तयार करताना सल्लागाराने नव्या प्रचलित दरांचा समावेश केला नव्हता. त्यामुळे ठेक्यांची रक्कम फुगल्याने सल्लागार कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश कार्यकारी समितीने दिले आहेत.

'एमएमआरडीए'ने डी.बी. इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड कन्सल्टींग जी.एम.बी.एच., हिल इंटरनॅशनल इन कॉर्पोरेटेड आणि लुईस बर्जर कन्सल्टींग या सल्लागार कंपन्या या कामासाठी नियुक्त केल्या होत्या. या कंपन्यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या कामांची अंदाजपत्रके तयार केली आहेत. या कंपन्यांनी प्रकल्पाचा आराखडा तयार करून ७११ कोटी ३४ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यात डेपो नियंत्रण केंद्र आणि प्रशासन इमारत, कर्मचारी निवासस्थाने, रस्ते, जलवाहिनी, पर्जन्यवाहिनी, माती भराव आणि मार्गिका अशा कामांचा समावेश होता.

टेंडर प्रक्रियेनंतर या कामांसाठी मे. एस.इ.डब्लू-व्ही.एस.इ.(जेव्ही), मे. एन.सी.सी प्रा. लि. आणि मे. रित्विक-के.पी.सी.पी.एल. (जेव्ही) या कंपन्यांनी टेंडर भरले आहे. त्यापैकी रित्विक-के.पी.सी.पी.एल. (जेव्ही) या कंपनीचे टेंडर अपात्र ठरवण्यात आले.

दरम्यान, मे. एस.इ.डब्लू-व्ही.एस.इ.(जेव्ही) कंपनीने २७ टक्के तर मे. एन.सी.सी प्रा. लि. या कंपनीने ३२ टक्के वाढीव दराने टेंडर भरले होते. याबाबत 'एमएमआरडीए'ने संबंधित कंपन्यांकडून घेतलेल्या खुलाशामध्ये बांधकाम सामग्रीच्या किंमतीत झालेली वाढ आणि टेंडरमधील दर हे राज्य दरसूची २०२२-२३ पेक्षा कमी असल्याचे समोर आले.

या टेंडर मधील अंदाजपत्रक हे सल्लागाराने सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य दरसूची २०२१-२२ आणि मुंबई महापालिका दरसूची २०१८च्या आधारावर तयार केले होते. यामुळे सल्लागाराने तयार केलेले अंदाजपत्रक हे प्रचलित आणि बाजार दरानुसार नसल्याने कामासाठी जास्त दराची टेंडर प्राप्त झाली आहेत, असे कार्यकारी समितीने स्पष्ट केले आहे.