MSRTC Shivai
MSRTC Shivai Tendernama
मुंबई

मुंबई-पुणे मार्गावर लवकरच नव्याकोऱ्या १०० 'ई-शिवाई' धावणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : एसटी महामंडळाने पहिली ई-शिवाई वातानुकूलित बस पुणे ते नगर मार्गावर चालवल्यानंतर येत्या डिसेंबर पासून मुंबई-पुणे मार्गावर सुद्धा ई-शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या मार्गावर नव्याकोऱ्या १०० शिवाई बस चालवण्यात येणार आहेत.

प्रदूषणुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने वातानुकूलित ई-शिवाई बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा १५० बस महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्यात येणार असून पहिल्या टप्यात ५० बस आणि दुसऱ्या टप्प्यात १०० बस दाखल होतील. ५० बसपैकी दोन बस पुणे-नगर-पुणे मार्गावर नुकत्याच चालवण्यात आल्या. मुंबई-ठाणे-पुणे मार्गावरही डिसेंबरपासून ई-शिवाई बस चालवण्याचे नियोजन आहे. कंपनीकडून या बस एसटी महामंडळाला मिळण्यास बराच विलंब झाला आहे.

या मार्गावर टप्प्याटप्प्यात ऑक्टोबर २०२२ पासून ३० ई-शिवाई बस येणार होत्या. त्यानंतर जानेवारी २०२३ पासून आणखी ई-शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन होते. दरम्यान, अलीकडेच मुंबईतील परेल आगार सोडता अन्य आगारात ई-शिवाई बससाठी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण केले आहे. ठाण्यातही बससाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे. परेल आगारात लवकरच हे काम होईल अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. १०० बसेसपैकी ९६ बस विविध मार्गांवर चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दादर ते पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिंचवड- २४ बस, परेल-स्वारगेट-२४ बस, ठाणे-स्वारगेट-२४ बस, बोरीवली-स्वारगेट-२४ बसचा समावेश आहे.