Thane
Thane Tendernama
मुंबई

Thane SRA Project : प्रकल्पांना गती; रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) शहरात अनेक एसआरएचे (SRA) प्रकल्प विविध कारणांनी रखडले असल्याने आमदार संजय केळकर यांनी नुकतीच एसआरएच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जाब विचारला. गेली दोन वर्षे बंद पडलेल्या प्रशांत नगरच्या प्रकल्पाबाबत एसआरए अधिकारी आणि विकासकाला धारेवर धरल्याने अखेर रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

ठाणे शहरात झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एसआरए योजना सुरू आहे, मात्र विविध कारणांनी हे प्रकल्प रखडले आहेत. रहिवाशांनी घरे रिकामी केल्यानंतर विकासक आधी विक्रीच्या घरांच्या इमारतीचे बांधकाम सुरु करतात, त्यामुळे रहिवाशांना त्यांची घरे वर्षानुवर्षे मिळत नाहीत. अशात विकासकाकडून घरभाडे वेळेवर मिळत नसल्याने रहिवासी देशोधडीला लागतात.

हे प्रकल्प तातडीने मार्गी लागून रहिवाशांना त्यांची हक्काची घरे मिळावीत. अशी मागणी आ. संजय केळकर यांनी एसआरएच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी आ. केळकर यांनी नौपाडा, प्रशांत नगर येथील दोन वर्षे रखडलेल्या एसआरए प्रकल्पातील रहिवाशांची व्यथा मांडत जाब विचारला. पुढील वर्षी मार्चपर्यंत या रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचे मान्य करण्यात आले तसेच दिवाळीपर्यंत एक इमारत पूर्ण होईल असे आश्वासनही यावेळी देण्यात आले. या बैठकीस माजी नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, डॉ. राजेश मढवी, आणि शेकडो रहिवासी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली असून प्रशांत नगरचा प्रकल्प मुदतीत पूर्ण होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच अधिकारी दर महिन्यास या प्रकल्पाची पाहणी करून बांधकामांचा आढावा घेतील. मुदतीत प्रकल्प पूर्ण झाला नाही, तर रहिवाशांना घेऊन कायदेशीर मार्ग चोखाळला जाईल, प्रसंगी तीव्र आंदोलनाचा मार्गही स्वीकारू, असा इशारा आ. संजय केळकर यांनी दिला.