Ravindra Chavan.
Ravindra Chavan. Tendernama
मुंबई

Ravindra Chavan : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांचा लवकरच मेकओव्हर; 269 कोटींची टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन इमारतींची दुरुस्ती, रंगकाम, सुशोभीकरणाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. यासाठी विभागनिहाय संबंधित मुख्य अभियंता यांच्या देखरेखीखाली टेंडरसंदर्भातील कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिले.

शासकीय तंत्रनिकेतन इमारतींची डागडूजी, रंगकाम, सुशोभीकरण, फेसलिफ्टिंग करण्याबाबतची आढावा बैठक मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली.
           
मंत्री चव्हाण म्हणाले की, ४० शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे फेसलिफ्टिंग करण्यासाठी अंदाजपत्रकानुसार २६९.११ कोटी इतका निधी लागणार आहे. यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे, त्यानुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने विभागनिहाय संबंधित मुख्य अभियंता यांच्या देखरेखेखाली एकच टेंडर प्रसिद्ध करावे. फेसलिफ्टिंगची कामे करण्याकरिता निधी उपलब्ध असल्याने तातडीने टेंडर प्रक्रिया अंतिम करून कालबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत.

संबंधित मुख्य अभियंता यांनी त्यांच्या अखत्यारित संस्थांचे बांधकाम जलदगतीने करण्याकरिता विस्तृत अंदाजपत्रकास त्वरित तांत्रिक मान्यता प्रदान करून टेंडर प्रसिद्ध करावी. याबाबत वेळापत्रकाची निश्चिती करावी. याकरिता ६५ टक्के निधी संस्था व संचालनालयाकडे उपलब्ध असून निधीअभावी पुढील प्रक्रिया थांबविण्याची आवश्यकता नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.
           
मंत्री पाटील म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाकरिताची व संस्थेच्या प्राचार्य व संबंधित अधिकाऱ्यांकरिताची आदर्श कार्यपद्धती याची अंमलबजावणी करण्यात यावी. फेसलिफ्टिंगची कामे गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर आदी उपस्थित होते.