Home Loan
Home Loan Tendernama
मुंबई

Mumbai : मोठी बातमी; घर खरेदीचा विचार असेल तर 'ही' बातमी वाचाच

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : चलनवाढीची स्थिती अजूनही नाजूक असल्याचे स्पष्ट करीत रिझर्व्ह बँकेने (RBI) अपेक्षेनुसार रेपो दरात (Repo Rate) पाव टक्का (०.२५ टक्के) वाढ केली. त्यामुळे आता रेपोदर ६.५ टक्के होईल. रेपोदरातील ही सलग सहावी वाढ आहे. यामुळे आता गृहकर्ज (Home Loan) साडेनऊ टक्क्यांच्या पलीकडे जाऊन गृहकर्जाचे हप्ते (EMI) वाढण्याची शक्यता आहे. यापुढे दरवाढीची शक्यता नाकारता येत नसल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेने दिला आहे.

चलनवाढीच्या कमाल मर्यादेच्या आसपास म्हणजे सहा टक्क्यांच्या आसपास सध्याची चलनवाढ असल्याने, तसेच जागतिक आर्थिक पातळीवरही सध्या अनिश्चिततेचे वातावरण असल्याचाही विचार करून हा निर्णय घेण्यात आला. मात्र या वर्षात चलनवाढ कमी होईल, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. 
मे २०२२ पासून ही सलग सहावी रेपोदरवाढ असून, त्यावेळेपासून आतापर्यंत रेपोदरात अडीच टक्के वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज येथे ही माहिती दिली.

या बैठकीत पतधोरण समितीचे दोन सदस्य व्याजदरवाढीस तयार नव्हते, तर अन्य चार सदस्यांनी व्याजदरवाढीच्या बाजूने मत व्यक्त केले. सध्याची चलनवाढीची स्थिती पाहता आणखी दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. मात्र जगातील अन्य प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनाच्या बरोबर विरुद्ध असे हे मतप्रदर्शन आहे. बँक ऑफ कॅनडा, बँक ऑफ इंग्लंड तसेच अमेरिकी फेडरल बँक यांनी आता व्याजदरवाढ थांबवण्याचे किंवा ती मंद करण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.

वाढीला सुरवात
कोरोना काळातील परिस्थितीमुळे दिलेली सवलत रद्द करण्याचे धोरण सुरू ठेवले जाणार असल्याचे आज दास यांच्याकडून सांगण्यात आले. देशांतर्गत वाढ चांगली आहे, उत्पादन क्षेत्रही जोमाने वाढते आहे, बंदरामधील जलवाहतूक, टोल वसुली आदींचे व्यवहार अत्यंत चांगले आहेत. देशांतर्गत मागणी आणि खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत असून ग्रामीण भागातील मागणीही वाढत आहे आणि गुंतवणूक वाढीसही सुरुवात होत आहे, असेही दास यांनी दाखवून दिले. रब्बी हंगामाचे पीक चांगले येण्याची शक्यता आहे. मात्र वस्तूंच्या जागतिक किमतींबाबत अनिश्चितता आहे आणि त्यांच्या पुरवठ्यातही अडथळे येण्याची शक्यता आहे, असेही आज सांगण्यात आले.

भविष्यातील चलनवाढ मर्यादेतच
आर्थिक वर्ष २०२३-२०२४ पर्यंत चलनवाढ ५.७ टक्क्यांच्या आसपास राहील, तर ग्राहक किंमत निर्देशांक चलनवाढ ५.३ टक्के राहण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या कमाल मर्यादेच्या म्हणजे सहा टक्क्यांच्या आतच राहण्याची अपेक्षा आहे, 
तर पुढील आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर ६.४ टक्के राहील. अर्थसंकल्पात व्यक्त केलेल्या अंदाजांशी हा दर मिळता जुळता आहे, असेही आज सांगण्यात आले. 

गृहकर्ज असे महागेल
- आजच्या दरवाढीमुळे सर्वच वित्तसंस्था गृहकर्जाचे दर वाढविण्याची शक्यता आहे. ही वाढ साधारण अशाप्रकारे होऊ शकते. 


- २० वर्षे मुदतीच्या ७० लाखांच्या गृहकर्जाचे ९.२५ टक्के व्याजदराने ‘ईएमआय’ आतापर्यंत ६४,१११ रु. होता. 

- आता ९.५० टक्के व्याजदराने ‘ईएमआय’ ६५,२४९ रु. होईल, म्हणजेच जुन्या ‘ईएमआय’ मध्ये १,१३८ रु. वाढ होईल.

- मे २०२२ मध्ये २० वर्षे मुदतीच्या ७० लाख रुपयांच्या गृहकर्जाचा ७ टक्के व्याजदराने ‘ईएमआय’ ५४,२७१ रु. होता. 

- आता अडीच टक्के व्याजदरवाढ झाल्याने ९.५० टक्के व्याजदराने तो ‘ईएमआय’ ६५,२४९ रु. होईल, म्हणजेच जुन्या ‘ईएमआय’मध्ये १०,९७८ रु. वाढ होईल.