Devendra Fadnavis, Maharashtra Government, Mantralaya Tendernama
मुंबई

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाबाबत सरकारने काय दिली गुड न्यूज?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): राज्यातील तरुणांना नोकरीयोग्य कौशल्ये देण्यासाठी उभारण्यात आलेल्या रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाला आता मुख्यालयासाठी इमारत मिळणार आहे.

पनवेल येथे उभारल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या मुख्यालयासह महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त संकुल इमारतीच्या पहिल्या टप्प्यास राज्य शासनाने ४३१.८० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम करण्यात येणार असून, लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. राज्यात कौशल्याधारित शिक्षणाची गरज वाढत असताना, विद्यापीठाची सुरुवात तात्पुरत्या स्वरूपात झाली होती. नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आवारात किंवा भाडेतत्त्वावरील इमारतींमध्ये केंद्रे सुरू करून विद्यापीठाने आपले काम सुरू ठेवले. या केंद्रांमधून अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाणिज्य, डिझाइन, सर्जनशील कौशल्ये तसेच अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जात आहेत.

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची रचना उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. ६० टक्के प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि ४० टक्के वर्ग व कार्यशाळा अशी रचना असल्याने विद्यार्थी थेट कामासाठी तयार होत आहेत. डिझाइन लॅब, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक प्रयोगशाळा, डेटा सेंटर आणि प्रोसेस ऑटोमेशन सेंटर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये विद्यापीठाच्या विविध केंद्रांवर १,०३४ विद्यार्थी प्रवेशित झाले असून, यामध्ये नवी मुंबईतील खारघर केंद्राचा मोठा वाटा आहे. उद्योगांशी थेट जोड निर्माण करण्यासाठी पर्सिस्टंट सिस्टिम्स, किर्लोस्कर ग्रुप, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांशी भागीदारी करण्यात आली आहे.

नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी विद्यापीठाने ‘आय स्पार्क फाउंडेशन’ या स्टार्टअप व इनक्युबेशन केंद्राची स्थापना केली आहे. अमृत योजनेतून २० स्टार्टअप्सना पाठबळ देण्यात येत असून, यशस्वी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. याशिवाय ‘कोड विदाऊट बॅरियर’ उपक्रमांतर्गत राज्यातील १० हजार महिला शिक्षक व विद्यार्थिनींना एआय कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सायबर सुरक्षा, आरोग्यसेवा, महिला नेतृत्व, रोजगार मेळावे अशा विविध उपक्रमांमुळे विद्यापीठ केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता, तरुणांना उद्योगाशी जोडणारा दुवा ठरत आहे.
आता पनवेलमध्ये उभारल्या जाणाऱ्या या भव्य संकुलामुळे कौशल्याधारित उच्च शिक्षणाला स्थैर्य मिळणार असून, राज्यातील तरुणांसाठी संधींची नवी दारे उघडणार आहेत.